रिक्षाचालकांचा नकाराचा मीटर ‘फास्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:54 AM2018-04-22T06:54:05+5:302018-04-22T06:54:05+5:30

दुप्पट-तिप्पट भाड्याची मागणी : कमी अंतरासाठी घेत नाहीत भाडे; प्रवाशांकडून कॅबच्या पर्यायाला पसंती

Rickshaw drivers' meter fast | रिक्षाचालकांचा नकाराचा मीटर ‘फास्ट’

रिक्षाचालकांचा नकाराचा मीटर ‘फास्ट’

Next

प्रज्ञा केळकर-सिंग।
पुणे : रिक्षावाले आणि पुणेकर यांच्या वादावादीचे किस्से सातत्याने कानावर पडत असतात. जवळच्या अंतरावरचे भाडे रिक्षावाल्याने नाकारल्याचा प्रसंग प्रत्येक पुणेकराने एकदा तरी अनुभवला असेल. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने पाहणी केली असता, कमी अंतरावर जाण्यासाठी मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार दिल्याचा अनुभव आला. त्याचप्रमाणे रिक्षाचालकांकडून दुप्पट-तिप्पट भाड्याची मागणी करण्यात आली. यामुळेच कॅबच्या पर्यायाला पसंती देत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
शहरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक वेळी स्वत:चे वाहन वापरणे अथवा बसने प्रवास करणे शक्य होत नाही. त्यातुलनेत रिक्षा इच्छित अंतरावर सोडत असल्याने या पर्यायाला प्रवासी पसंती देतात. पुण्यामध्ये मीटरने रिक्षाचे भाडे आकारणे नियमाने बंधनकारक करण्यात आले आहे.
भाड्याची मूलभूत रक्कम १८ रुपयांपासून सुरू होते. त्यांनतर अंतर वाढत जाते त्याप्रमाणे मीटरवरील रक्कम वाढत जाते. मात्र, बऱ्याचदा मीटरनुसार भाडे आकारण्यास रिक्षाचालक नकार देतात. त्यामुळे अनेकदा ग्राहकांचा भ्रमनिरास होतो. अशा वेळी, ग्राहक तक्रार नोंदवू शकतात, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी टोलफ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

स्थळ : शिवाजीनगर न्यायालयासमोर
(नागरिक रिक्षा थांबवण्यासाठी हात दाखवतो.)
नागरिक : संगमवाडी पुलावर जायचे आहे.
रिक्षा : एवढ्या जवळ नाही जाणार साहेब
नागरिक : अहो, खूप महत्त्वाचे काम आहे. लवकर पोहोचायचे आहे.
रिक्षा : ५० रुपये होतील.
नागरिक : मीटरने नाही का नेणार?
रिक्षा : एवढ्या जवळच्या अंतरावर परवडत नाही साहेब.

स्थळ : मंगळवार पेठ
रिक्षावाला : कुठे जायचे आहे मॅडम?
नागरिक : आरटीओला सोडता का?
रिक्षावाला : दोन चौकच पुढे जायचे आहे. परवडत नाही मॅडम.
नागरिक : मीटरने यायला काय प्रॉब्लेम आहे?
रिक्षावाला : मीटरने जायचे असेल तर तिप्पट पैसे होतील. एक तर जवळच्या ठिकाणी गेलो, की रांगेतला नंबर जातो आणि नुकसान होते. शक्यतो आम्ही जवळच्या जवळ जातच नाही.
नागरिक : वयस्कर माणसाला अडचण असेल तर काय करणार?
रिक्षावाला : वयस्कर व्यक्ती असेल तर नाइलाजाने जावेच लागते. पण, किमान ६०-७० रुपये मोजावे लागतील. आमचेही पोट यावरच चालते मॅडम. नुकसान तरी सहन कसे करायचे?

भाडे नाकारणाºया रिक्षाचालकांकडून नियमाप्रमाणे दंड वसूल केला जातो. तसेच, चालकाचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ शकतो, असे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

जवळच्या प्रवासासाठी मीटरप्रमाणे भाडे नाकारणे किंवा जास्त भाडे आकारणे गैर आहेच. परंतु, रिक्षाचालकांसाठी नियम अधिक कडक आणि कॅबसाठी नियमांमध्ये शिथिलता, असा फरक नेहमीच दिसून येतो. त्यामुळे रिक्षाचालकांची प्रतिक्रिया स्वाभाविक असते. वाहतूक पोलीस स्वत:चे दिवसाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने रिक्षाचालक, टेम्पोचालक यांनाच अडवून दंड ठोठावला जातो. नियमांची अंमलबजावणी हवीच; पण कायदा सर्वांसाठी सारखा हवा, असे वाटते.
- नितीन पवार, रिक्षा पंचायत

शासनाने रिक्षा परवानामुक्त धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे शहरात सुमारे ९,००० नवीन रिक्षांची भर पडली आहे. आणखी ४ ते ५ हजार नवीन रिक्षा येतील. प्रवाशांना सेवा देणे, हे रिक्षाचालकांचे कर्तव्य आहे. या कर्तव्यात कसूर झाल्यास संबंधित रिक्षाचालकाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येते. तसेच, ५०० रुपयांचा दंडही ठोठावला जातो. अशी चूक पुन्हा केल्यास त्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला जातो. नागरिकांच्या रिक्षाचालकांबाबत काही तक्रारी असल्यास ते कार्यालयीन वेळेत १८००२३३००१२ या टोलफ्री क्रमांकावर तक्रार करू शकतात.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक तक्रारी
पुणे : शहरातील रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे रिक्षाचालकांविरोधातील तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारण्याच्याच आहेत. त्याखालोखाल जादा भाडे, उद्धट वर्तन, मीटर फास्टच्या यांचा समावेश आहे.
रिक्षाचालकांनी भाडे नाकारल्यास त्यांच्याविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रारी करता येतात. तक्रार आल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाला नोटीस पाठवून त्यावर सुनावणी घेतली जाते. तक्रारीत तथ्य आढळल्यास रिक्षाचालकाला ५०० रुपये दंड किंवा १५ दिवसांसाठी परवाना निलंबित केला जातो.त्यानुसार प्रवाशांकडून आरटीओकडे आलेल्या तक्रांरीमध्ये भाडे नाकारण्याच्याच तक्रारी अधिक आहेत. रिक्षा स्टँडला रिक्षा उभी असल्यास रिक्षाचालकाने प्रवाशांना इच्छित ठिकाणी घेऊन जाणे अपेक्षित आहे; पण काही रिक्षाचालकांकडून जवळच्या अंतराचे भाडे नाकारण्याचे प्रकार घडतात. केवळ आपल्या सोयीचे किंवा लांब पल्ल्याचे भाडे घेण्याकडे काही रिक्षाचालकांचा कल असतो. त्यामुळे प्रवाशांना अन्य रिक्षाची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते.

मागील वर्षभरात रिक्षाचालकांविरोधात भाडे नाकारणे, उद्धट वर्तन, जास्त भाडे घेणे, मीटर फास्ट यांसह अन्य एकूण १८७ तक्रारी आल्या. अनेक प्रवासी तक्रारी करण्याचे टाळतात. त्यामुळे प्रत्यक्षात येणाºया तक्रारी व भाडे नाकारणाºया रिक्षाचालकांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. एकूण तक्रारींमध्येही भाडे नाकारण्याच्या तक्रारी अधिक असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले. आरटीओकडून संबंधित रिक्षाचालकांना वर्ष २०१६-१७मध्ये ३ लाख ३० हजार रुपयांचा, तर वर्ष २०१७-१८मध्ये १ लाख १९ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: Rickshaw drivers' meter fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.