Returns the depositor's money by completing the project; Keep me in my old age - DSK | प्रकल्प पूर्ण करून ठेवीदारांचे पैसे परत देतो; मला वृद्धाश्रमात ठेवा - डीएसके
प्रकल्प पूर्ण करून ठेवीदारांचे पैसे परत देतो; मला वृद्धाश्रमात ठेवा - डीएसके

पुणे : हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून दोन वर्षांमध्ये ठेवीदारांचे पैसे परत करून काही रक्कम शिल्लक राहील, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयात दिली. तसेच मला वृद्धाश्रमामध्ये ठेवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे परत न करून फसवणूक केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात डीएसकेंविरोधातील खटल्याची सुनावणी सुरू आहे. २०१४पासून २०१७ पर्यंत जी व्यक्ती प्रकल्प पूर्ण करू शकली नाही, ती व्यक्ती दोन वर्षात प्रकल्प कसे
पूर्ण करणार, असा सवाल विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच डीएसके न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचे सांगितले.
डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, त्यातील विक्री योग्य असलेल्या मालमत्तांची यादी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान डीएसके यांना न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी डीएसके यांनी न्यायालयाकडे बोलण्याबाबत संधी मागितली. ठेवीदारांचे ५०१ कोटी रुपये सहज देता येऊ शकतात. म्हाडासोबत अनेक प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आलेले आहेत, असे डीएसके यांनी न्यायालयाला सांगितले. त्याला अ‍ॅड. चव्हाण यांनी विरोध केला. आजच्या तारखेला ठेवीदारांचे १ हजार २८६ कोटी इतके देणे आहे. १ हजार ६५० कोटी रुपये बँकांचे देणे आहे. तर, १३५ कोटी रुपये एमसीडीचे देणे आहे. मग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डीएसके कोठून पैसे आणणार, असा प्रश्न अ‍ॅड. चव्हाण यांनी उपस्थित केला.


Web Title: Returns the depositor's money by completing the project; Keep me in my old age - DSK
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.