Report of the demand for paving the question paper, Pune; Department Secretariat Information | प्रश्नपत्रिका फुटल्याचा पुणे मंडळाने मागविला अहवाल; विभागीय सचिवांची माहिती

ठळक मुद्देबारावीची प्रश्नपत्रिका व्हायरल करून कॉपी करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा केला जातो उपयोगपेपरफुटी रोखण्यासाठी मंडळाने कडक उपाययोजना करूनही पेपर व्हायरल होण्याच्या प्रकारांत वाढ

पुणे : बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतानाच तो बार्शीच्या वसंत महाविद्यालय तांबेवाडी येथून व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी तातडीने पाठविण्यात आले आहे. त्याबाबतचा अहवाल लगेच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी दिली.
बारावीची प्रश्नपत्रिका व्हायरल करून कॉपी करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा उपयोग केला जातो. वसंत महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतरही इंग्रजीच्या पेपरमधील उत्तरे लिहून ती पेपर देत असलेल्या विद्यार्थ्यांना पुरविली जात असल्याचे आढळून दिसून आले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून दहावी-बारावीचा पेपर सुरू असतानाच व्हॉट्स अ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या प्रकारांना रोख लावण्यासाठी राज्य मंडळाकडून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट विद्यार्थ्यांच्या सहीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशीरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता.
व्हॉट्स अ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने काही शिफारशी केल्या होत्या. 
प्रत्येक वर्गातील पर्यवेक्षकांकडे २५ प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट देण्यात येणार. पर्यवेक्षकांनी हे सिलबंद पाकिट परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची सही घेऊन उघडायचे असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली तरीही प्रश्नपत्रिका पेपर सुरू होताच व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर यात सहभागी असलेले विद्यार्थी परीक्षा केंद्रात उशीराने आल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून उशीरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचाही निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. 
पेपरफुटी रोखण्यासाठी मंडळाने कडक उपाययोजना करूनही पेपर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


Web Title: Report of the demand for paving the question paper, Pune; Department Secretariat Information
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.