पीक विमा योजनेचा लाभ रिलायन्सला; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:34 AM2018-09-20T01:34:55+5:302018-09-20T01:35:17+5:30

शेतकऱ्याच्या नावावर विमा कंपनीचे हित जपले जात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

Reliance benefits from crop insurance scheme; Radhakrishna Vikhe-Patil's allegation | पीक विमा योजनेचा लाभ रिलायन्सला; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप

पीक विमा योजनेचा लाभ रिलायन्सला; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप

Next

पुणे : नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळावे, सुरक्षितता वाटावी यासाठी शासनाकडून शेतकरी पीक विमा योजना सुरू केली आहे; मात्र या योजनेचा खरा लाभार्थी रिलायन्स कंपनी आहे. शेतकऱ्याच्या नावावर विमा कंपनीचे हित जपले जात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी केला.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या कै. वि. श्री. जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, पीक विमा योजनेचा आत्तापर्यंत ४ हजार कोटी रुपये विमा प्रिमीयम भरला आहे; मात्र नुकसानग्रस्त शेतकºयांना केवळ १ हजार ६०० कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. विमा कंपन्यांना सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा फायदा झाला असून, त्यातील सर्वाधिक वाटा हा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला मिळाला आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात महसुलात १८ टक्के वाढ होती. या सरकारच्या काळात हा आकडा ११ टक्के झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकार खोटे आकडे सांगण्यात आणि आकड्यांचा खेळ खेळण्यात माहीर आहे. यातून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे, असाही आरोप विखे पाटील यांनी केला.
जलयुक्त शिवार योजनेवर टीकास्त्र सोडत विखे-पाटील म्हणाले की, जलयुक्त नव्हे झोलयुक्त शिवार योजना आहे. कृषीसाठी विभागवार वेगवेगळे धोरण असणे गरजेचे आहे. विखे पाटील म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. त्यांच्यासारखे अनेक तरुण सध्या समाजात आहेत. सनातनसारख्या कट्टरवादी संस्थांच्या वाढत्या कारवाया घातक असून, त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदूच होते.
सनातनी प्रवृत्ती असलेल्या संस्थांनी आंदोलने केली. त्यातून अंदुरे व कळसकर घडले आहेत. त्यामुळे या संघटनेला ठेचून काढले पाहिजे. मात्र, त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. ‘एटीएस’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपींना पकडल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदनदेखील केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री या संघटनांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न आहे.

प्रकाश आंबेडकरांशी बोलणार
भाजपाच्या इशाºयावर ‘एमआयएम’चे काम चालते. या पक्षासोबत भारिप बहुजन महासंघाने युती केल्याचे समजते. यामागील अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्याप कळालेले नाही; मात्र मी स्वत: अ‍ॅड. आंबेडकर यांच्याशी बोलणार आहे. त्यांना महाआघाडीत आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याशिवाय बहुजन समाज पार्टीसोबतही बोलणे सुरू असून, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणारच आहे. इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे विखे-पाटील म्हणाले.

पत्रकार संरक्षणाचा मुद्दा मांडणार
पत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे पत्रकारांना सर्व बाजूंनी संरक्षण आणि सुरक्षिततेचा मुद्दा मी आगामी अधिवेशनात मांडणार असून, यासंबंधीचा अहवाल त्वरित केंद्राला पाठवावा, यासाठी आग्रही राहणार आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Reliance benefits from crop insurance scheme; Radhakrishna Vikhe-Patil's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.