उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचा प्लॅन देणार - डी.एस.कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 11:27 AM2017-11-21T11:27:49+5:302017-11-21T14:48:53+5:30

गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे आम्ही अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही. पण, आता त्यातून बाहेर पडत असून पोझिटिव्ह दिशेने आमचा प्रवास सुरु झाला आहे.

To refund all the money, no one has been cheated so far - DS Kulkarni | उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचा प्लॅन देणार - डी.एस.कुलकर्णी

उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचा प्लॅन देणार - डी.एस.कुलकर्णी

Next
ठळक मुद्देडीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. पेपर टाकत मोठा झालो, त्यामुळे मीडियाशी माझे जवळचे संबंध आहेत.

पुणे - गेले वर्षभर आर्थिक अडचणीमुळे आम्ही अनेकांचे पैसे परत करु शकलो नाही. पण, आता त्यातून बाहेर पडत असून पोझिटिव्ह दिशेने आमचा प्रवास सुरु झाला आहे. उच्च न्यायालयात गुंतवणुकदारांचे पैसे परत कसे करणार याचा प्लॅन देणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत. फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही पुन्हा भरारी घेऊ, असे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्याविरुद्ध गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीनावर येत्या शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंबंधीच्या विविध बातम्या देत असून त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याने आपण माध्यमांशी बोलण्याचा निर्णय घेतल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी हेही उपस्थित होते. 

ते म्हणाले, आम्ही १९८० पासून बांधकाम व्यवसायासाठी मुदत ठेवी घेत असून नोव्हेंबर २०१६ पर्यंत कोणाचेही पैसे बाकी  नव्हते. जानेवारी ते ऑक्टोंबर २०१६ पर्यंत गुंतवणुकदारांचे अडीचशे कोटी रुपये परत केले आहेत. त्यानंतर आम्हाला पैशांची चणचण सुरु झाली. गुंतवणुकदारांचे पैसे वेळेत परत करण्यासाठी टोयोटा कंपनीतून येणारे पैसे आम्ही इकडे वळविले. खेळते भांडवल नसल्याने १३ गृहप्रकल्पाचे काम बंद पडले़ आमच्या अडचणी वाढू लागल्या. त्यातूनही ऑक्टोंबर २०१७ मध्ये आम्ही बाहेर आलो होतो, मात्र पोलिसांमध्ये तक्रार झाली. त्यामुळे आमच्या जागा विकत घेणारे मागे हटले. त्यामुळेच टोयोटोच्या शोरुम विकल्या गेल्या नाहीत. या शोरुम आम्ही पुन्हा सुरु करु. 

इस्त्रायली कंपनीबरोबर आम्ही सोलापूर रोडला डायमंडचा सेझ प्रकल्प सुरु करणार होतो. सेझसाठी घेतलेली जमीन जर तो प्रकल्प ५ वर्षात उभा राहिला नाही तर, शेतक-यांना परत द्यावी लागते. ती परत करावी लागू नये, यासाठी या जमिनी प्रथम डीएसके कुटुंबियांच्या नावावर घेतल्या व नंतर त्या कंपनीला ५ ते १० टक्के चढ्या भावाने विकल्याचे डीएसके यांनी कबुल केले.

आमच्या मालमत्तेचा बँकांनी ताबा घेतला असला तरी त्याचा आमच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. बंद पडलेले १३ गृहप्रकल्पाचे काम आम्ही सुरु करत आहोत. ते पूर्ण झाले की त्यातून २ हजार कोटी रुपये मिळतील़ ड्रीम सिटीतून १० हजार कोटी रुपये मिळू शकणार आहेत. आमच्या सर्व मालमत्तांची कमीतकमी किंमत गृहीत धरली तरी ती ९ हजार १२४ कोटी रुपये होत असून आमच्यावर जास्तीत जास्त १५०० कोटी रुपयांची देणी आहेत. 

गुंतवणूकदारांचे नोव्हेंबर २०१७ अखेर १६५ कोटी रुपये देणे आहे. २०२० पर्यंत मुदत ठेवीचे आम्हाला ५८९ कोटी रुपये द्यायचे असून दरमहा मुदत पूर्ण होणा-या ठेवीचे पैसे देण्यासाठी साधारण १५ कोटी रुपये लागतात. त्याचा आराखडा आम्ही उच्च न्यायालयाला देत असून न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांचे पैसे परत देणार असल्याचे डी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.

राजकीय नेत्याने केला होता प्रयत्न
आपली कंपनीत आर्थिक अडचणीत आल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाने सुमारे १० महिन्यापूर्वी गुंतवणुकदार शोधण्यासाठी प्रयत्न केला होता, असे सांगून डीएसके म्हणाले, ड्रीम सिटीपेक्षा पाच पट मोठे प्रकल्प करणा-या या व्यावसायिकाने मंदीमुळे गुंतवणुक करण्यास नकार दिला. आता परदेशी गुंतवणुकदारच आमच्याकडे गुंतवणुक करु शकतात. 
कुटुंबातीलच सदस्याने अडचणीत आणले
आपल्या कंपनीत असलेल्या आमच्या कुटुंबातील एका सदस्याने माझ्या विरोधात माहिती पुरविली. गुंतवणुकदारांच्या बैठकीतील संभाषणापैकी डीएसके  यांचे दीड हजार रुपयांचे चेक परत जातात. पत्नीला मुर्ख म्हणालो, असा व्हिडिओ काटछाट करुन व्हायरल केला. त्यामुळे अफवा पसरुन आमच्या अडचणीत वाढ झाली.

डीएसकेंनी अडचणी येण्याची सांगितलेली कारणे
* जानेवारी २०१६ बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी
* एप्रिल २०१६ मध्ये ठाण्यात बिल्डरने केलेल्या आत्महत्येमुळे व्यवसायावर झालेला परिणाम
*  ड्रीम सिटीमध्ये गुंतवणुक  करणारी इस्त्रायल कंपनी बंद पडल्याने सेझ रद्द करावा लागला.
* मे २०१६ मध्ये आपल्याला झालेला अपघात, त्यातून गुंतवणुकदारांकडून मुदत ठेवींचे नुतनीकरण करणे बंद झाले. पैसे परत मागणे सुरु झाले.
* नोटाबंदीनंतर नवीन फ्लॅटचे बुकींग बंद झाल्याने रोखता संपली आणि आर्थिक अडचणीत आलो.

Web Title: To refund all the money, no one has been cheated so far - DS Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.