‘न्यूड’विषयीचे धुके लवकरच निवळेल : रवी जाधव; बालगंधर्वमध्ये ‘शोध मराठी मनाचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:25 PM2018-01-03T15:25:48+5:302018-01-03T15:28:39+5:30

'न्यूड'विषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केला. जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी संवाद साधला.

Ravi Jadhav will soon remove the fog about 'Nude'; 'Shodh Marathi Mancha' In Balgandharva, | ‘न्यूड’विषयीचे धुके लवकरच निवळेल : रवी जाधव; बालगंधर्वमध्ये ‘शोध मराठी मनाचा’

‘न्यूड’विषयीचे धुके लवकरच निवळेल : रवी जाधव; बालगंधर्वमध्ये ‘शोध मराठी मनाचा’

googlenewsNext
ठळक मुद्दे'संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रति सेन्सॉर बोर्ड निर्माण होऊ नये''वादाला प्रतिवाद करण्याची तयारी ठेवून काम केले पाहिजे'

पुणे : मी जे जे स्कूल आॅफ आर्टसचा विद्यार्थी असल्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लिलता नाही, तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी. न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. घराला असलेल्या उंबरठ्याप्रमाणे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातही एक उंबरठा असतो, त्यामुळे 'न्यूड'विषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केला. 
जागतिक मराठी अकादमीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित 'शोध मराठी मनाचा'  या १५व्या जागतिक संमेलनात प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 
वैयक्तिक आयुष्यापासून चित्रपट सृष्टीतील पदार्पण, विविध चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव, त्यात येणारी आव्हाने आणि एकूणच कलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन या सगळ्यांशी संबंधित विविध प्रश्नांना उत्तरे देताना रवी जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 
रवी जाधव म्हणाले, की कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती करणे ही सोपी गोष्टी नसल्यामुळे त्या स्टेजपर्यंत जात असताना दिग्दर्शक-निर्मात्याला एक प्रकारची प्रगल्भता प्राप्त झालेली असते. ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना  दिग्दर्शक-निर्मात्यांनी पूर्ण अभ्यास करून पुराव्यांनीशी काम केले पाहिजे. वादाला प्रतिवाद करण्याची तयारी ठेवून काम केले पाहिजे. चित्रपटांमध्ये काय असावे किंवा काय नसावे हे ठरविण्यासाठी आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असताना संस्कृती रक्षणाच्या नावाखाली प्रति सेन्सॉर बोर्ड निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा आहे. 
चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या बदलत्या भूमिकेबद्दल विचारले असता रवी जाधव म्हणाले, की काही अपवाद वगळता पूर्वी चित्रपटात अभिनय करणे किंवा पार्श्वगायिका असणे इतकीच महिलांची भूमिका मर्यादित होती. आता मात्र चित्रपट निर्मितीमधील सगळ्या स्वरुपाच्या कामांमध्ये महिलांनी आघाडी घेतली असून ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळे महिलांच्या विचारांना अधिक चालना मिळत असून त्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. 
आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना रवी जाधव म्हणाले, की माझे वडिल गिरणी कामगार होते, त्यामुळे माझीही वाटचाल असेच काहीसे काम करण्याकडे होती. मात्र, स्वत: विषयी विचार करताना मला काहीतरी वेगळे सांगायचे आहे, हे लक्षात आले आणि त्यातून मी कला क्षेत्राकडे वळलो. माझ्या पालकांपर्यंतच्या पिढीने स्वत: चे आयुष्य मुलांना उभे करण्यातच व्यथित केले, त्यासाठी स्वत: च्या अनेक गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या. त्यामुळे, तुला संधी मिळते आहे तर सतत नवीन काहीतरी करीत रहा, असे माझे वडिल मला नेहमीच सांगायचे. सुरवातीला मी जाहिरात क्षेत्रात काम करू लागलो. हळूहळू स्क्रीप्ट रायटींगकडे वळलो. त्यावेळी कामाच्या निमित्ताने बराच काळ परदेशात असताना मला फार तुटलेपण जाणवायचे. त्यावेळी मी अनेक मराठी पुस्तके बरोबर घेऊन जायचो. त्या वाचनातून मला आपली संस्कृती, कला, साहित्य याविषयी आकर्षण वाटायला लागले. मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा बॉसने माझे कौतुक केले आणि तू प्रयत्न करीत रहा, तुझे प्रयोग फसले तर परत माझ्याकडे ये, तुझी जागा मी रिकामी ठेवतो असे सांगितले. पण जेव्हा मी नटरंग चित्रपट करायचा ठरवला, त्यावेळी तमाशापट ही संकल्पना आता जुनी झाली आहे, असे मला अनेकजण म्हणाले. पण याही चित्रपटातून मला काहीतरी वेगळेच प्रेक्षकांना द्यायचे होते. आधुनिक पद्धतीने हा तत्कालीन विषय मांडताना मी खूप संशोधन केले, त्यावेळी कुटुंबीयांनी मला खूप सहकार्य केले. बालगंधर्वच्या निर्मितीच्या वेळी देखील खूप अभ्यास केला. मी मूळचा चिपळूणचा असल्यामुळे त्याठिकाणी मी बरेचदा नाट्यसंगीत ऐकले होते, पुढे डोंबिवलीत आल्यानंतर मात्र त्यापासून काहीसा दुरावलो होतो. 
बालक-पालक या वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाविषी सांगताना ते म्हणाले की, माझा मुलगा १३-१४ वर्षांचा झाल्यानंतर मला अनेक प्रश्न विचारु लागला. लैंगिकतेविषयीच्या त्याच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी इंटरनेटचा आधार शोधू लागलो, त्यावेळी आपल्याप्रमाणेच परदेशातही हा विषय पाहिजे तितक्या मोकळेपणाने हाताळला जात नसल्याचे लक्षात आले. तेव्हा या विषयावर चित्रपट तयार करण्याचे निश्चित केले आणि मनोरंजनातून शिक्षणाचा मार्ग मी अवलंबला. हा प्रत्येक चित्रपट तयार करताना मला अनेक अडचणी आल्या, पण त्यांच्यावर मात करून मी पुढे गेलो आणि त्यातूनच घडतही गेलो. या अडचणीच तुम्हाला परिपूर्ण बनविण्यासाठी मदत करीत असतात, असे वाटते. तुम्ही कोणाला आणि काय दाखवू इच्छितात, यावर तुमचे यश अवलंबून असते. 
भविष्यातील योजनांविषयी सांगताना जाधव म्हणाले, की माझ्या वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे मी सतत काहीतरी नवीव करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता करीत असलेले काम मी फार तर २०२० सालापर्यंत करेल आणि त्यानंतर नवीन विषयात स्वत:ला वाहून घेईल.

Web Title: Ravi Jadhav will soon remove the fog about 'Nude'; 'Shodh Marathi Mancha' In Balgandharva,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.