राज ठाकरे यांचे लक्ष आता विधानसभेवर ; पुण्यात घेतली बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:24 PM2019-06-03T15:24:16+5:302019-06-03T15:25:39+5:30

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेकडे मोर्चा वळवला असून त्यादृष्टीने त्यांनी पुण्यात तीन दिवसीय बैठकांचे आयोजन केले आहे.

Raj Thackeray's attention is now on the Vidhan Sabha; A meeting held in Pune | राज ठाकरे यांचे लक्ष आता विधानसभेवर ; पुण्यात घेतली बैठक 

राज ठाकरे यांचे लक्ष आता विधानसभेवर ; पुण्यात घेतली बैठक 

Next

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभेकडे मोर्चा वळवला असून त्यादृष्टीने त्यांनी पुण्यात तीन दिवसीय बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांमधून ते विधानसभा मतदार संघातील काम आणि ताकद अजमावत असल्याचे समजते.  साधारण सहा महिन्यांनी होऊ शकणाऱ्या निवडणुकांची तयारी त्यांनी सुरु केल्याचे समजते. या बैठकीत मतदारसंघांनुसार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचे समजते. 

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात सभा घेतल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणुका लढवणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ठाकरे यांनी त्याआधी राज्यात फिरून पक्षाची स्थिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. 

  ठाकरे यांच्या पक्षाचा सद्यस्थितीत पुण्यात एकही आमदार नसून  महापालिकेत दोन नगरसेवक आहेत. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी त्यांनी पदाधिकाऱ्यांना बोलावून काही याद्या आणि लेखी मुद्दे मागवून घेतले होते. त्यानंतरच्या थेट लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता ठाकरे या बैठकीतून काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत जाण्याविषयीची मते विचारण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष बैठकीत माध्यमांना प्रवेश नसून कोणत्याही पदाधिकाऱ्यास मोबाईल नेण्यासही मनाई आहे. बैठकीतील कोणत्याही मुद्द्याची माध्यमात चर्चा होऊ नये याविषयी प्रत्यक्ष राज ठाकरे यांनीच कार्यकर्त्यांना डोस दिल्याचे समजते. एकूणच ठाकरे यांचा रागरंग बघता राष्ट्रवादीच्या पाठोपाठ मनसेही आगामी निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. 

Web Title: Raj Thackeray's attention is now on the Vidhan Sabha; A meeting held in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.