- प्रज्ञा केळकर-सिंग 
पुणे : कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध कंगो-यांना स्पर्श करणाºया पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने रंगभूमीला अनेक कलाकार दिले. रंगमंचाच्या या गावाची सफर करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व समृद्ध होत असते. मात्र, सोशल मीडियाचा प्रभाव, चकचकीत एकांकिका सादर करण्याची धडपड, तयार संहितेकडील वाढता कल, यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील ‘प्रायोगिकता’ हरवत चाललीआहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यंदाच्या स्पर्धेमध्ये प्रायोगिक एकांकिकेसाठी ‘जयराम हर्डीकर’ करंडक कोणत्याही संघाला देण्यात आला नाही. वेगळा प्रयोग सादर
न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मत परीक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीला नव्या संहितांचा अभाव जाणवत असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली.
मिलिंद फाटक म्हणाले, ‘पुरुषोत्तम हे सर्जनशीलता, कल्पकता आणि नावीन्यपूर्ण प्रयोगाचे व्यासपीठ आहे. लोकांना काय आवडेल, याचा विचार न करता नव्या कल्पना मांडून त्या एकांकिकेतून उतरायला हव्यात. यंदाच्या वर्षी अनेक नव्या कल्पना एकांकिकेमध्ये पाहायला मिळाल्या. मात्र, त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगांचा अभाव दिसला. प्रायोगिक एकांकिकेच्या जयराम हर्डीकर करंडकासाठी एकही एकांकिका ‘प्रायोगिक’ असल्याचे दिसून आले नाही.
आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही करतो, तेच चांगले अशी मानसिकता तयार झाली आहे. वेगळे काही ऐकून घेण्याचीही त्यांची तयारी नसते. पुरुषोत्तमच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यशाळेत सतीश आळेकर यांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले होते. अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो.’

वैविध्यपूर्ण प्रयोगाचे प्रमाण कमी
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धांचा हंगाम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा ठरतो. गेल्या पन्नास वर्षांत ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. आपली रंगमंचीय कला सादर करण्यासाठी विद्यार्थी अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. मात्र, स्पर्धेला अपेक्षित असणाºया वैविध्यपूर्ण प्रयोगांचे प्रमाण गेल्या काही काळामध्ये कमी झाल्याची खंत परीक्षक, नाट्यकर्मींनी व्यक्त केली आहे. एकांकिकांमध्ये संहिता, नेपथ्य, संवाद, प्रकाशयोजना याबाबत विद्यार्थ्यांनी प्रयोगशील सादरीकरण करणे अपेक्षित असते. संहिता ते प्रयोग या प्रवासात संशोधक, चिकित्सकवृत्तीने नावीन्याचा शोध घेऊन परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न अपेक्षित असतो. मात्र, आजकाल ऐकीव आणि तयार माहितीवर अवलंबून राहणे, तयार संहितेचा वापर याकडील विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याने ‘प्रायोगिकता’ कमी झाल्याची खंत परीक्षक मिलिंट फाटक यांनी व्यक्त केली.

पुरुषोत्तमच्या रंगमंचावर चकचकीत एकांकिका सादर करणे अपेक्षित नसतेच. दुनियेपेक्षा वेगळे काहीतरी सादर करावे, हाच हेतू असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामध्ये ओबडधोबडपणा असणारच; मात्र वेगळा प्रयोग सादर करण्यासाठी त्यांनी झटायला हवे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील गाभाच गायब होत आहे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकातील फरक कळेनासा झाला आहे. सुवर्णमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ‘संहिता ते प्रयोग’ याअंतर्गत कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. कार्यशाळेलाही विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. प्रयोगांमधील उथळपणा ही धोक्याची घंटा आहे, हे विद्यार्थ्यांनी ओळखायला हवे. शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या एकांकिकांमध्ये जास्त वैविध्य पाहायला मिळत आहे. इतर संघांच्या एकांकिका पाहण्याचा संयमही विद्यार्थ्यांमध्ये नसतो. त्यामुळे प्रयोगशीलता हरवत चालली आहे.
- राजेंद्र ठाकूरदेसाई, महाराष्ट्रीय कलोपासक संघ

यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये परीक्षकांना एकही एकांकिका ‘प्रायोगिक’ वाटली नाही. एकांकिका स्पर्धेचा निकाल व्यक्तिसापेक्ष असतो. वेगळे प्रयोग पाहण्याची आपली मानसिकताही कमी होतेय का, याचा विचार व्हायला हवा. गेल्या १० वर्षांमध्ये अभिनयकौशल्य जास्तीत जास्त वास्तववादी होत आहे. नाटक प्रयोगक्षम असते, कोणता प्रयोग कोणत्या दिवशी कसा रंगेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे सातत्याने प्रयोग पाहायला मिळत असतात.
- योगेश सोमण