पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 02:01 AM2018-09-20T02:01:52+5:302018-09-20T06:49:56+5:30

विदेशातील नागरिकांना भारतीय सण व संस्कृतीचे घडले दर्शन

Purandar's students Ganeshotsav in Russia | पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव

पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव

googlenewsNext

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यातील विद्यार्थिनी रशियात उच्चशिक्षणासाठी जातात व भारतीय परंपरेनुसार त्या ठिकाणी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतात. यामुळे गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.
भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. शिक्षण, व्यापार, नोकरी आदी कारणांनी अनेक भारतीय परदेशात जातात.

अनेक भारतीय कुटुंबे परदेशात राहत आहेत. तेथे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरगुती स्वरूपात गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पद्धतीने पूजा करून परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले जाते. पुरंदर तालुक्यातील काजल चौंडकर (नायगाव), काजल भिंताडे (भिवडी), ऋतुजा कुंभारकर (वनपुरी), सायल जगताप (जेजुरी), आर्या पाटील (धनकवडी) या मुली उच्च वैद्यकीय शिक्षण रशिया येथे घेत आहेत. परदेशात शिकत असलेल्या या विद्यार्थिनींना सुट्टी मिळत नसल्यामुळे उत्सवासाठी भारतात येता येत नाही.

गणपतीविषयी असणारी ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यामुळेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या तेथील राहत्या घरी गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापनादेखील केली आहे. आपण कोठेही असोत मनात भक्तिभाव असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे या विद्यार्थिनींनी दाखवून दिले आहे. आम्हाला भारत देशाची आठवण येत असते. आम्ही सगळे येथे एकत्र येऊन शक्य तेवढे सण साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव लाभावे, हीच आमची इच्छा आहे. भारताची संस्कृती परदेशात देखील जपण्याचे प्रयत्न करत असल्याचे काजल चौंडकर हिने सांगितले. भारतीय सण विदेशात साजरे करताना आनंद मनामध्ये असतोच परंतु, घरापासून दूर असल्याची खंतही असते. मात्र, या सणांमधून नवी ऊर्जा, नवी उमेद आणि उत्साह मिळतो. तेथील नागरिकांना भारतीय संस्कृतीची ओळख करुन देता येत असल्याचेही काजल म्हणाली.

Web Title: Purandar's students Ganeshotsav in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.