शॉर्टकटसाठी पुणेकरांची पसंती ‘उलटे’ येण्याला..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 02:07 AM2018-12-19T02:07:47+5:302018-12-19T02:08:06+5:30

गेल्या आठवड्यामध्ये बिबवेवाडीतील भारत ज्योती बस थांब्याजवळ अशाच प्रकारे आॅटोरिक्षा आणि मोटारीचा अपघात झाला.

Pune's choice for shortcut is coming in the opposite direction. | शॉर्टकटसाठी पुणेकरांची पसंती ‘उलटे’ येण्याला..

शॉर्टकटसाठी पुणेकरांची पसंती ‘उलटे’ येण्याला..

Next

लक्ष्मण मोरे

पुणे : वाहतूक नियमांचे पालन आणि पुणेकर यांचा तसा ३६चा आकडा आहे, हे काही नवे नाही; मात्र अलीकडच्या काळात वाहनचालक ‘शॉर्टकट’ मारण्यासाठी सरळ नो एंट्रीमध्ये घुसतात; तसेच विरुद्ध बाजूने जाण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. काही वाहनचालकांची ही बेदरकारी जिवावर बेतू लागली आहे. गेल्या तीन वर्षांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या या दोन्ही प्रकारच्या एकूण ४ लाख २३ हजार २९० कारवायांमध्ये ७ कोटी ३६ लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेल्या आठवड्यामध्ये बिबवेवाडीतील भारत ज्योती बस थांब्याजवळ अशाच प्रकारे आॅटोरिक्षा आणि मोटारीचा अपघात झाला. या अपघातात मोटारीने दिलेल्या धडकेत आॅटोरिक्षामधील सीएनजी गॅसने पेट घेतला. या आगीमध्ये रिक्षाचालक आणि एक प्रवासी भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. रिक्षाचालक किशोर नरके (वय २७, रा. पर्वती) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवाशाच्या फिर्यादीवरून मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाची एक चूक जिवावर बेतली आहे. वाहनचालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत असलेली उदासीनता अपघातांना निमंत्रण देत आहे.
राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यभरात विरुद्ध बाजूने येणाऱ्या आणि नो एंट्रीमध्ये वाहन घालणाºया वाहनचालकांविरुद्ध मोहीम उघडली होती. अशा नियमभंग करणाºया वाहनचालकांविरुद्ध सक्त कारवाईचे आदेशही त्यांनी दिलेले होते. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर फरकही पडला होता; मात्र अलीकडे कारवाई थंडावल्याने पुणे शहरामध्ये जागोजाग वाहनचालक विरुद्ध बाजूने येण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे वाहतूक शाखेने गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. विरुद्ध बाजूने येण्याला दुचाकी, तीनचाकी, ट्रक, बस, मोटारी कोणत्याही वाहनाचा अपवाद राहिलेला नाही. पुणे शहरातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता अशा महत्त्वाच्या रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही विरुद्ध बाजूने वाहन दामटविण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या वाहनचालकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास उलट त्यांच्याच दमदाटीचा सर्वसामान्यांना सामना करावा लागतो. अनेकदा पोलीस समोर असूनही हे प्रकार घडतात. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. वास्तविक नियमांचे पालन करणाºया वाहनचालकांना संरक्षण देण्यासोबतच दोषी वाहनचालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

शासन आणि प्रशासनाचे वाहतूकविषयक धोरण उदासीन आहे. ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असं काहीसं चित्र आहे. पोलीस, महापालिका यांसह नागरिकांमध्येही उदासीनता आहे. वाहतूक संस्कृती रुजविण्याची आवश्यकता आहे. उलट नियमभंगाला प्रोत्साहन मिळेल अशीच स्थिती सध्या आहे. विरुद्ध बाजूने येणारे आणि नो एंट्रीमधून येणाºया वाहनचालकांमुळे अनेकदा अपघात घडतात; मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात. लोकांना शिस्त लागू शकते; मात्र त्यासाठी कारवाईसोबतच प्रभावी प्रबोधनाची आवश्यकता आहे.
- जुगल राठी, वाहतूक प्रश्नाचे अभ्यासक

रस्त्यावर घडत असलेल्या अपघातांमध्ये बेशिस्तीमुळे सर्वाधिक अपघात घडतात. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण विरुद्ध बाजूने येणाºया वाहनांमुळे घडतात. सरळ जाणाºया वाहनचालकाला अचानक विरुद्ध बाजूने आल्यास सावरता येत नाही. वाहनावरील ताबा सुटतो. अलीकडे लोकांची भावना मीच ठरवणार कुठून जायचे ते, अशी झालेली आहे. द्रुतगती मार्ग, एमआयडीसी जवळील महामार्ग, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर विरुद्ध बाजूने येणाºयांचे प्रमाण खूप आहे. राज्यामध्ये सरासरी दररोज ३५ लोकांचा अपघातात मृत्यू होतो. त्यामुळेच महासंचालक असताना विरुद्ध बाजुने येणाºयांविरुद्ध मोहिम उघडली होती.
- प्रवीण दीक्षित,
माजी पोलीस महासंचालक

सहन करावी लागते वाहनचालकांची अरेरावी
1विरुद्ध बाजूने आलेल्या किंवा
नो एंट्रीमधून आलेल्या वाहनचालकांना सरळ येणाºया वाहनचालकांनी जाब विचारल्यास दोषी वाहनचालकांच्या अरेरावीचा सामना करावा लागतो. अनेकदा यामुळे रस्त्यावरच किरकोळ स्वरूपाचे वाद उद्भवल्याचेही
पाहायला मिळते. त्यामुळे याबद्दल काही बोलायचे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2चौकातील वाहतूक पोलिसांकडे गेल्यास ‘तुमचे तुम्ही पाहून घ्या’ अशी उत्तरे मिळत असल्याचा अनुभव वाहनचालकांना येतो. त्यामुळे यावर अंकुश कसा येणार, असा प्रश्न आहे. शाळा-महाविद्यालये, दवाखाने, स्थानिक मंडई, मार्केट आणि शासकीय कार्यालयांजवळील रस्त्यांवर विरुद्ध बाजुने येण्याचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: Pune's choice for shortcut is coming in the opposite direction.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे