ठळक मुद्देआरटीओमार्फत ७ व ८ नोव्हेंबर असे दोन दिवस राबविण्यात आली तपासणी मोहीमकारवाईत संबंधितांकडून ६७ हजार ७१० रुपये कर आणि १ लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

पुणे : अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये ८३ वाहने दोषी आढळून आली. त्यांपैकी ४३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
शहर, तसेच उपनगरांमध्ये तीन व सहा आसनी रिक्षा, खासगी बस, जीप तसेच अन्य वाहनांतून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, प्रवासी परवाना नसणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणे, कर न भरणे, वाहनांची तपासणी न करणे आदी प्रकार घडत असतात. 
याविरोधात आरटीओमार्फत ७ व ८ नोव्हेंबर असे दोन दिवस तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये शहरात विविध ठिकाणी सुमारे ३०० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामधील ८३ वाहने दोषी आढळली असून, त्यांपैकी ४३ जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली वाहने प्रामुख्याने कोथरूड, स्वारगेट डेपो व प्रादेशिक परिवहन कार्यालय आवारात ठेवण्यात आली आहे. 
या कारवाईत संबंधितांकडून ६७ हजार ७१० रुपये कर आणि १ लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 
या मोहिमेसाठी एकूण ६ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक पथकात चार मोटार वाहन निरीक्षक नेमण्यात आले होते. ही मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली.