Pune Municipal Corporation suspended a meeting | विरोधकांच्या पवित्र्याने भाजपाची घबराट; पुणे महापालिकेची सभा केली तहकूब

ठळक मुद्देशहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर आयोजित करण्यात आली होती खास सभा अशा तहकुबीने महत्वाचे विषय लांबणीवर पडतात; काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

पुणे : विरोधकांचा आंदोलनाचा पवित्रा लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपाने महापालिकेची सभा अचानक तहकूब केली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांवर खास सभा आयोजित करण्यात आली होती.
भाजपा नगरसेवकांच्या पतींची महापालिकेतील शिरजोरी वाढतच चालली आहे. एका नगरसेविकेच्या पतीने अभियंत्याच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीला बुधवारी लाथ मारली. या ताज्या प्रकरणाशिवाय पाणी योजनेतील मीटर खरेदीवरून भाजापाच्या नगरसेवकांमध्येच फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. हा विषय सभेत काढण्यात येणार होता. तसेच अन्य काही विषयांवर विरोधक आंदोलन करणार असल्याची कुणकूण लागल्याने सभा सूरू होताच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी काही सेकंदातच तहकुबीची सूचना मांडली. महापौर मुक्ता टिळक यांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे भिमाले यांनी त्यांना वर जाउन माहिती दिली.
सर्व गटनेत्यांनी तहकुबीचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मात्र सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट शब्दात याचा इन्कार केला. तहकुबीच्या सूचनेला विरोधी पक्षनेत्याचे अनुमोदन असते, ते नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
अधिकाऱ्यांना आता संरक्षण हवे अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे योगेश ससाणे भैया जाधव कमांडोच्या गणवेशात आले होते. सभा तहकुबीने त्यांचा हिरमोड झाला. 
गफुर पठाण हे सदस्य घनकचरा उपविधी व सायकल शेअरिंग या दोन्ही विषयांवर बोलण्यासाठी मुद्दे काढून आणले होते. त्यानीही सभा तहकुबी बद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपाच्या धिरज घाटे दिपक पोटे यांनी सभा तहकुबी सर्वांच्या विचारानेच ठरली होती असे सांगितले.
दरम्यान प्रशासनामध्यही सभा अचानक तहकूब केल्याने नाराजी होती. सदस्य अभ्यास झाला नाही असे कारण देतात मात्र सभेच्या आठ ते तीन दिवस आधी सर्व सदस्याना विषयाची लिखीत माहिती दिली जाते. अशा तहकुबीने महत्वाचे विषय लांबणीवर पडतात असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.