ऐन पावसाळ्यात पालिकेचे ‘गटार’काम : तब्बल साडेपाच कोटींच्या निविदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 11:43 AM2019-06-11T11:43:06+5:302019-06-11T11:47:57+5:30

पाणी पैशांसारखे उधळू नका म्हणणारी पालिका पैसेच लागली उधळू..

the pune municipal corporation doing 'drenej' work In the monsoon : tenders of 4.5 crores | ऐन पावसाळ्यात पालिकेचे ‘गटार’काम : तब्बल साडेपाच कोटींच्या निविदा

ऐन पावसाळ्यात पालिकेचे ‘गटार’काम : तब्बल साडेपाच कोटींच्या निविदा

Next
ठळक मुद्देविद्यूत वगळता अन्य कामे पावसाळ्यापुर्वी होणे अपेक्षित

- लक्ष्मण मोरे 
पुणे : पावसाळापूर्व कामांचा बोजवारा उडालेला असतानाच पालिकेने ‘पाणी पैशांसारखे उधळू नका!’ असा संदेश देणाऱ्या पालिकेने करदात्या पुणेकरांचा पैसा मात्र पाण्यासारखा खर्च करायला सुरुवात केली आहे. शहरातील विविध प्रभागांमधील विकासकामांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निविदांमध्ये सर्वाधिक कामे ड्रेनेजची आहेत. तब्बल साडेपाच कोटी रुपयांची कामे ऐन पावसाळ्यात काढण्यात आली आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार होतील की नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे. 
पालिकेच्या नियोजनाबाबत कायमच टीका होत आली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरही पालिकेचे वरातीमागून घोडे अशी गत झाली आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रभाग क्रमांक १६, २९, ३६, १८, ३७ मध्ये ही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी निविदा परिमंडल पाचचे उपायुक्त माधव देशपांडे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या निविदांमध्ये ड्रेनेज व पावसाळी लाईन्सची कामे करणे, राडारोडा उचलणे, फरशी बसविणे, कॉंक्रिटीकरण करणे, विद्यूत संबंधी कामे, पदपथ तयार करणे भिंतीवरील चित्र रंगविणे अशी कामे नमूद करण्यात आलेली आहेत. वास्तविक यातील विद्यूत वगळता अन्य कामे पावसाळ्यापुर्वी होणे अपेक्षित होते. 
फरशी बसविणे व रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी तब्बल १ कोटी ६ लाख १७ हजार १४८ रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या प्रभागांमध्ये रस्त्यांचे आणि गल्लीबोळांचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी पुन्हा रस्ते खोदावे लागणार आहेत. या कामांची मुदत सहा महिन्यांची असून यातील चार महिने तर पावसाळ्याचेच असणार आहेत. तर ड्रेनेज च्या स्वच्छतेसाठी ३१ लाख ४७ हजार ४०३ रुपयांची कामे देण्यात आली आहेत. यासोबतच विद्यूत दुरुस्तीची १७ लाख ८४ हजारांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांव्यतिरीक्त नागझरीला सीमाभिंत बांधण्यासोबतच डांबरीकरण करणे, अभ्यासिका बांधणे, इमारत दुरुस्ती अशी कामेही निविदेमध्ये नमूद करण्यात आली आहेत. पावसाळ्यामध्ये रस्ते तसेच कोणत्याही प्रकारच्या खोदाईला परवागनी देण्यात येत नाही. त्यामुळे पालिकेने स्वत:च्याच नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. 
निविदा काढताना पावसाळ्यामध्ये होणारी नागरिकांची संभाव्य गैरसोय प्रशासनाने लक्षात घेतली नसल्याचे दिसत आहे. बहुतांश कामांची मुदत पावसाळ्याच्या दिवसांमध्येच येत असल्याने ही कामे सुरु असताना होऊ शकणाºया संभाव्य दुर्घटनांचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. 
====
प्रभाग क्रमांक २८ क, मध्ये भिंतीमध्ये रंगविणे व चित्र काढणे, तसेच २८ ब मध्ये विविध ठिकाणी सीमाभिंती चित्र रंगविणे व सुशोभिकरण करणे, प्रभाग क्रमांक ३६ अ, मध्ये शाळांना रंगरंगोटी करणे, समाज मंदिरात रंगरंगोटी कामे करणे या कामांसाठीही निविदा काढलेल्या आहेत. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रंगकाम काढल्यास हा रंग किती टिकेल असा प्रश्न आहे. सीमाभिंती आणि सार्वजनिक भिंतींवर रंगरंगोटी आणि काढलेली चित्रे पावसाळ्यात टिकतील का असा प्रश्न आहे. 
====
ड्रेनेज/पावसाळी        फरशी/कॉँक्रीटीकरण        राडारोडा        ड्रेनेज स्वच्छता        चेंबर दुरुस्ती
५,५५,७२,३९०        १,०६,१७,४८६        ३८,३८,५१९    ३१,४७,४०३        १७,३२,४६२

Web Title: the pune municipal corporation doing 'drenej' work In the monsoon : tenders of 4.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.