पुणे : नवरात्रीचा उत्साह शिगेला पोचला असून जागोजाग दांडिया रासचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देवी भक्तांना अधिक आनंद लुटता यावा, याकरिता शेवटचे दोन दिवस स्पीकर वाजविण्यासाठी रात्री बारापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
गणेशोत्सवामध्ये रात्री बारापर्यंत स्पीकर वाजविण्यासाठी चार दिवस परवानगी देण्यात आलेली होती. अलिकडच्या काळात नवरात्र साजरी करण्याचे प्रमाण शहरामध्ये वाढत चालले आहे. या कालावधीदरम्यान, शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
नवरात्रीचा सण देवीभक्तांसाठी पर्वणी असतो. यासोबतच
शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रास दांडीयांचेही कार्यक्रम आयोजित केले जातात. नागरिकांमधून रात्री बारापर्यंत स्पीकरला परवानगी देण्याची मागणी केली जात होती. जिल्हाधिकारी सौरभ
राव यांनी गुरुवार व शुक्रवार
असे शेवटचे दोन दिवस रात्री बारापर्यंत स्पीकर वाजविण्यासाठी परवानगी दिली आहे.
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १९ आॅक्टोबर रोजी, नाताळच्या दिवशी आणि ३१ डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.