Pune: The Deputy District-cum-caught both were caught in a bribe | पुणे : उपजिल्हाधिका-यासह दोघांना लाच घेताना पकडले

पुणे : जमिनीबाबत दाखल असलेल्या अपिलावर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिका-यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. उपजिल्हाधिकारी श्रीपती खंडु मोरे (वय ४१, रा. वडगाव शेरी) आणि खासगी व्यक्ती रामचंद्र पोपटराव खराडे (वय ४५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांच्या आते बहिणीच्या जमिनीबाबत हवेली प्रांत अधिका-यांकडे अपिल दाखल केले होते़ हे प्रकरण पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भूसंपादन अधिका-या क्रमांक ११ चे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्याकडे वर्ग केले होते़ या अपिलाबाबत निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी व या निकालाचे आदेश तक्रारदार यांना देण्यासाठी भूसंपादन अधिकारी श्रीपती मोरे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली़ तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ या तक्रारीची गुरुवारी पडतळाणी करण्यात आली तेव्हा त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवीन प्रशासकीय इमारतीतील भूसंपादन कार्यालय क्रमांक ११ येथे सायंकाळी सापळा रचला़ तक्रारदारांकडून या कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी खासगी व्यक्ती रामचंद्र खराडे यांच्यामार्फत १५ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाई केल्यानंतर त्या पाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुस-या पथकाने त्यांच्या वडगाव शेरी येथील घरावर छापा टाकून तपासणी सुरु केली आहे. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.


Web Title: Pune: The Deputy District-cum-caught both were caught in a bribe
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.