Pune Builder Devendra Shah has been shot dead by three bike borne assailants on Prabhat road | पुणे: अज्ञातांचा गोळीबार, बिल्डर देवेंद्र शहांचा मृत्यू; खंडणी प्रकरणातून हल्ला झाल्याचा संशय

पुणे: प्रभात रस्त्यावर  शनिवारी रात्री अज्ञातांकडून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देवेंन्द्रभाई जयसुखलाल शहा यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरा दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंन्द्रभाई शहा हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे. अंबिका ग्रुप ऑफ रिअल इस्टेट नावाने त्यांचा व्यवसाय आहे. काल रात्री अकराच्या सुमारास शहा हे त्यांच्या प्रभात रोडवरील गल्ली नंबर 7 सायली अपार्टमेंट येथील राहत्या घरी होते. यावेळी दुचाकीवरील आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अपार्टमेंटमधील खाली असलेल्या इस्त्री दुकानदाराला शिविगाळ करून शहा यांना खाली बोलवून आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार शहा यांना सांगितला. हे ऐकूण शहा आणि त्यांचा मुलगा दोन्हीही लिफ्टमधून खाली आले. शहा बाहेर येताच दोन्ही आरोपींनी लागोपाठ 5 गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी शहा यांच्या कमरेत आणि दुसरी छातीत लागली. गोळीबार करून दोघेही दुचाकीवरून फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या शहा यांना तातडीने पुना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
दरम्यान,याप्रकरणी रात्री उशिरा डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे. अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या वस्तीत घडलेल्या या घटनेने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.