पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:31 AM2019-05-27T06:31:06+5:302019-05-27T06:31:24+5:30

‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

Punalekar, Bhave helped to dispose of pistols | पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत

पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत

Next

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी अटक करण्यात आलेले ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. हत्येत वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास पुनाळेकरने मदत केली, तर भावे याने दाभोलकरांच्या घराची रेकी केली, असा सीबीआयचा आरोप आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यातूनच या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यानंतर या दोघांना सीबीआयच्या पथकाने रविवारी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितले की, कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. तत्पूर्वी दाभोळकर यांच्याबाबत सर्व माहिती भावे याने रेकी करून त्यांना दिली. कळसकर आणि अंदुुरे यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी भावे याच्याकडे असून ती जप्त करायची आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या पिस्तुलासह इतर चार पिस्तुले पुनाळेकरच्या सल्ल्याने ठाण्याच्या खाडीत फेकून देण्यात आली. याचा पूर्ण तपास करायचा असल्याने पोलीस
कोठडी मिळावी, अशी मागणी अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केली. ती मान्य करत पुनाळेकर आणि भावे या
दोघांना १ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, अ‍ॅड. पुनाळेकर याने नवी मुंबईतील सीबीआय कार्यालयात वकिलांची भेट घेण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. तो मंजूर करण्यात आला. या प्रकरणात सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संवेदनशील माहिती एका इंग्रजी नियतकालिकाला पैसे घेऊन विकली, असा आरोप अ‍ॅड. पुनाळेकरने केला. मात्र न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही.

Web Title: Punalekar, Bhave helped to dispose of pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.