पुणे : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती शहरात विविध राजकीय पक्षांच्या आंदोलनांनी साजरी झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप तसेच अन्य काही संस्था-संघटनांनी मोर्चे, निदर्शने, मानवी साखळी यांद्वारे या निर्णयाचा निषेध केला; तर भारतीय जनता पक्ष व रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया यांनी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली.
काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन करून या निर्णयाचे वर्षश्राद्ध घातले. सायंकाळी मेणबत्ती मोर्चाही काढला. सकाळी साडेदहा वाजता शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली एस.पी. कॉलेजपासून अभिवन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला पथनाट्य सादर करून या निर्णयाने झालेल्या तोट्याबद्दल नागरिकांना जागृत करण्यात आले. माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, रोहित टिळक, संजय बालगुडे, आबा बागुल, गोपाळ तिवारी, सदानंद शेट्टी, रशीद शेख, नीता रजपूत तसेच पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. मंडईतून निघालेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सांगता झाली. तिथे पवार, सुळे, चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जनतेची आर्थिक पिळवणूक झाली असल्याची टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरली असल्याचेच या वर्षात सिद्ध झाले. आता त्यांनी भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनीही नोटाबंदीचे समर्थन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दर १० वर्षांनी चलनात बदल करण्यात यावा, असे सुचविले होते. त्याचेच पालन पंतप्रधान मोदी यांनी केले, असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी केला. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमानी कांबळे, सोनाली लांडगे, शशिकला वाघमारे, महीपाल वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.

भाजपाच्या वतीने संभाजी उद्यानाजवळ या निर्णयाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी या ठिकाणी थोडा वेळ हजेरी लावली. शहराध्यक्ष योगेश गोगावले तसेच अन्य पदाधिकारी, नगरसेवक या वेळी उपस्थित होते. विरोधकांकडून नोटाबंदीबाबत अपप्रचार केला जात आहे. देशाला या निर्णयाचा फायदाच झाला असून, काळा पैसा निर्माण होण्याला पायबंद बसला आहे, असे या वेळी सांगण्यात आले. देश मोदींच्या या निर्णयाच्या मागे उभा आहे, असा दावा करण्यात आला. संभाजी उद्यान येथे मोठे फलक उभारून त्यावर नागरिकांच्या स्वाक्षºया घेण्यात येत होत्या.

‘आप’ तसेच अन्य काही संस्था-संघटनांच्या वतीनेही नोटाबंदीच्या निषेधार्थ मानवी साखळी, व्याख्याने, निदर्शने यांचे आयोजन करण्यात आले होते. आपने लक्ष्मी रस्ता येथे मानवी साखळी केली व केंद्र सरकारने भारतीय जनतेची फसवणूक केली असल्याची टीका केला. काही संस्थांनी तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले होते. भारिप-बहुजन महासंघाने ८ नोव्हेंबर हा ‘लुटारू दिवस’ म्हणून साजरा करून निषेध व्यक्त केला. शहरातील विविध चौकांमध्ये जाऊन या वेळी घोषणा देण्यात आल्या. रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बंड गार्डन चौक येथे सांगता करण्यात आली.