पुणे : सुरुवातीला ‘तुझं नाव काय’ हेदेखील मला त्या मुलींना विचारता येत नव्हते. कर्णबधिर व मूकबधिर मुलींना नृत्य शिकविणे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच अवघड होती. भाषा जशी शब्दांची असते तशी ती हृदयाची, स्पर्शाची आणि नजरेचीदेखील असते. नृत्य शिकवताना नजरेच्या भाषेतून त्यांच्यातील कलेची आवड दिसली. नजरेच्या व स्पर्शाच्या माध्यमातून आमच्या हृदयांचे सुरू जुळले, असे सांगत कथक नृत्यांगना शिल्पा दातार यांनी नृत्याच्या आठवणी उलगडल्या.
सूत्रधारतर्फे ‘वर्ल्ड स्टोरीटेलिंग डे’निमित्त भारतीय कथाकथनाच्या विविध शैलींची ओळख करून देण्यासाठी ‘सूत्रधार - अ मिलीयन स्टोरीज टू टेल’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रभात रस्त्यावरील प्रिझम फाउंडेशन येथे करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे उपस्थित होत्या. ब्ली टेक इनोव्हेशनच्या जान्हवी जोशी, नूपुरा किर्लोस्कर यांनी कर्णबधिर व्यक्तींसाठी तयार केलेल्या उपकरणाची माहिती सांगितली. आयोजक मधुरा आफळे, तोषल गांधी, नताशा पूनावाला, वल्लरी आपटे यांनी कीर्तनावर आधारित नृत्याचे सादरीकरण केले.
शिल्पा दातार म्हणाल्या, ‘‘गुरूकडून मिळालेले ज्ञान, संस्कार अत्यंत महत्त्वाचे असतात. मला माझ्या गुरूकडून मिळालेल्या कलेचा योग्य प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी कर्णबधिर व मूकबधिर मुलींना नृत्य शिकवायला मी सुरुवात केली. मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकले. नृत्यशैलीतील ताल शिकवत असताना त्यांचा उत्साह पाहून मनाला समाधान मिळत होते.’’
हल्ली कोणतेही सामाजिक कार्य केले, तर त्याचा गवगवा केला जातो; परंतु कधी तरी एखादे काम स्वत:च्या समाधानासाठीदेखील केले पाहिजे’ असेही त्यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)