पुणे शहरात लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:50 PM2019-06-21T12:50:39+5:302019-06-21T12:57:43+5:30

स्वारगेट, शिवाजीनगर, संगमवाडी व पुणे स्टेशन या चार ठिकाणी बाहेरगावी ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Pre-paid rickshaw service will be started soon in Pune city | पुणे शहरात लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु होणार 

पुणे शहरात लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु होणार 

Next
ठळक मुद्दे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव नुकताच ‘आरटीए’समोरनवीन योजनेच्या अंमलबजावणीची संपुर्ण जबाबदारी वाहतुक पोलिसांवर राहणार

पुणे : काही वर्षांपूर्वी बंद पडलेली प्रीपेड रिक्षा सेवा शहरात पुन्हा लवकरच सुरू होणार आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, संगमवाडी व पुणे स्टेशन या चार ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणा (आरटीए) कडून नुकतीच या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 
शहरात काही वर्षांपूर्वी पुणे स्टेशन, स्वारगेट व शिवाजीनगर या वर्दळीच्या ठिकाणांहून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला रिक्षांसह प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी राहिल्याने काही महिन्यांतच ही योजना गुंडाळावी लागली. आता पुन्हा साडे तीन ते चार वर्षांनी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव नुकताच ‘आरटीए’समोर मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पूर्वीच्या तीन ठिकाणांमध्ये आता संगमवाडीचाही समावेश करण्यात आला आहे. चारही ठिकाणी बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे.
नवीन योजनेच्या अंमलबजावणीची संपुर्ण जबाबदारी वाहतुक पोलिसांवर राहणार आहे. जागेची निवड, सुविधा निर्माण करणे, योजना कार्यान्वित करून अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांकडेच सोपविण्यात आले आहे. आरटीओकडून या योजनेचा आराखडा तयार करून देण्यात आला आहे. रिक्षाचे टप्पानिहाय भाडे, अंतर आदी माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे. हे भाडेही निश्चित करण्यात आले आहे. अनेकदा जवळच्या अंतरासाठी रिक्षा चालकांकडून नकार दिला जातो. त्यानुसार अंतर व भाडे याचा ताळमेळ घालण्यात आला आहे. जेणेकरून रिक्षा चालकांनाही जवळचे भाडे घेणे परवडेल, असे समजते.
-----------
आरटीओकडून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याबाबत आरटीएकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाली असून पुढील अंमलबजावणी वाहतुक पोलिसांकडून केली जाणार आहे. त्यांच्या स्वतंत्र यंत्रणा ही सेवा कार्यान्वित करेल. आरटीओकडून भाडे निश्चित करून देण्यात आले आहे. 
- विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे विभाग

Web Title: Pre-paid rickshaw service will be started soon in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.