रस्तेखोदाईमुळे शहरातील वीजपुरवठा झाला ‘गुल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:56 AM2019-02-02T02:56:24+5:302019-02-02T02:56:41+5:30

चार दिवसांत ८ घटना; मध्यवस्तीतील पुणेकर त्रस्त

Power supply in city gets 'Gul' | रस्तेखोदाईमुळे शहरातील वीजपुरवठा झाला ‘गुल’

रस्तेखोदाईमुळे शहरातील वीजपुरवठा झाला ‘गुल’

Next

पुणे : महापालिकेची रस्तेखोदाई व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) खोदकामामुळे गेल्या चार दिवसांत तब्बल आठ ठिकाणी महावितरणच्या ११ केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याची घटना घडली. यामुळे स्वारगेट, टिळक रस्ता, सुभाषनगर परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे तब्बल ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. महावितरणशी समन्वय न साधताच खोदाई केल्याने, वीजवाहिन्या तुटल्याचे महावितरणने सांगितले.

शुक्रवारी (दि. १)देखील वीजवाहिनी तोडली गेल्याने दुपारी दोन वाजता सुभाषनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. तेथे सायंकळपर्यंत पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात आला. सुमारे ९० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. तर, उर्वरित दोन रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पर्वती विभागातील स्वारगेट, टिळक रस्ता, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, चाटे कॉलनी, तहसील कार्यालय या परिसराला स्वारगेट व सुभाषनगर या दोन ११ केव्ही भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. सध्या पुणे महापालिकेकडून नेहरू स्टेडियम येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. तसेच, महालक्ष्मी मंदिर ते सारसबागेदरम्यान ‘एमएनजीएल’कडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या खोदकामात २९ जानेवारीपासून आत्तापर्यंत या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्या वेगवेगळ्या आठ ठिकाणी तुटल्या. यात पुणे महापालिकेच्या खोदकामात पाच ठिकाणी, तर एमएनजीएलने केलेल्या खोदकामात तीन ठिकाणी वीजवाहिनी तुटली. सुभाषनगर वीजवाहिनी तीन ठिकाणी, तर स्वारगेट वीजवाहिनी पाच ठिकाणी तुटली. बहुतांश वेळा रात्रीच्या सुमारास हे प्रकार घडले आहेत.

महावितरणचे अभियंते व कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी झटत आहेत.
मात्र, महावितरणशी समन्वय न साधता सुरू असलेल्या या खोदकामांमुळे सुमारे ९ हजार ग्राहकांना नाहक फटका बसला असून, महावितरणचेदेखील आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या चार दिवसांत या दोन्ही वीजवाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा सुमारे १० तास खंडित राहिला.
महावितरणकडून या प्रकाराबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात आले असून, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Power supply in city gets 'Gul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.