पुणे रेल्वे स्टेशनवरील पूल : ८० वर्षांपासून गर्दी सोसूनही खंबीर उभा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:41 AM2019-03-18T03:41:15+5:302019-03-18T03:41:33+5:30

वर्ष १९३८... तेव्हा पुण्यातून काही वर्षांपासून रेल्वे धावत होती... प्रवाशांची संख्या शेकड्यामध्ये असेल... त्यावेळी ‘मी’ उभा राहिलो. थेट इंग्लंडमधून ‘ट्रस’ म्हणजे त्रिकोणीय रचना असलेला सांगाड्यासाठी लोखंड आणण्यात आले होते.

 Pool at the Pune Railway Station: For 80 years, the crowds stand firm and strong ... | पुणे रेल्वे स्टेशनवरील पूल : ८० वर्षांपासून गर्दी सोसूनही खंबीर उभा...

पुणे रेल्वे स्टेशनवरील पूल : ८० वर्षांपासून गर्दी सोसूनही खंबीर उभा...

Next

- राजानंद मोरे

पुणे -  वर्ष १९३८... तेव्हा पुण्यातून काही वर्षांपासून रेल्वे धावत होती... प्रवाशांची संख्या शेकड्यामध्ये असेल... त्यावेळी ‘मी’ उभा राहिलो. थेट इंग्लंडमधून ‘ट्रस’ म्हणजे त्रिकोणीय रचना असलेला सांगाड्यासाठी लोखंड आणण्यात आले होते. आज प्रवाशांचा आकडा शेकड्यावरून लाखांवर पोहचला... पण ‘मी’ मात्र अजूनही तसाच उभा आहे... पूर्वीप्रमाणेच दणकट, पुढील अनेक वर्षांसाठी, प्रवाशांच्या सेवेसाठी...
पुणे रेल्वे स्थानकावरील पहिला ८० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पादचारी पूल आजही आपल्या दणकटपणाची साक्ष देत उभा आहे. मुंबईत नुकत्यात पादचारी पूल कोसळल्याचा दुर्घटनेनंतर या पुलाबाबत लगेच चर्चा सुरू झाल्या. पण या पुलाची मजबुती आजही कमी झालेली नाही, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत. मुंबई-पुणे रेल्वेलाईन १८५६ मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर ३० वर्षांनी पुणे ते मिरज मार्ग पूर्ण झाला. १९२८ मध्ये मुंबई ते पुणे या शहरांदरम्यान पहिली एक्स्प्रेस ट्रेन धावली, ती म्हणजे डेक्कन क्वीन. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकातील प्रवाशी सुविधांमध्ये वाढ होत गेली. रेल्वे प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार, पहिला पादचारी पूल १९३८ मध्ये उभारण्यात आला. टप्प्याटप्प्याने फलाट वाढत गेल्यानंतर हा पूलही वाढविण्यात आला. सुमारे ५८ वर्षांनी म्हणजे १९९६ मध्ये राजा बहादुर मिल रस्त्याच्या पलीकडे या पुलाची दुसरी बाजू काढण्यात आली.
रेल्वे स्थानकावर सुमारे १२ वर्षांपूर्वी दुसऱ्या पुलाची उभारणी झाली. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी तिसरा आणि मागील वर्षी सर्वांत मोठा चौथा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या पुलांमध्ये जुन्या पुलावरील गर्दी कमी झाली असली तरी ते प्रमाण तुलनेने कमी आहे.
आजही अनेक प्रवाशांकडून जुन्या पुलाचाच वापर होत आहे. पूर्वी हा एकमेव पूल प्रवाशांना सेवा देत होता. लाखो प्रवाशांची ये-जा या पुलावरून होत होती. आजही ही स्थिती बदललेली नाही. पण त्यानंतरही
आज हा पूल तेवढाच दणकट असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

त्रिकोणीय रचना : इतर पुलांच्या तुलनेत हादरे बसतात..

पुलाची बांधणी करण्यासाठी इंग्लंडमधून ‘ट्रस’ आणण्यात आले होते. ट्रस म्हणजे गर्डरच असतात, पण त्याची बांधणी वेगळी असते. त्रिकोणीय रचना असलेला लोखंडी सांगडा या पुलासाठी वापरण्यात आला आहे. दोन त्रिकोण एका पिनने जोडण्यात आले आहेत.

ही रचना असलेला पूल ज्या खांबावर उभा आहे, ते खांब मात्र इथलेच आहेत. इंग्रजांनी बांधलेले रेल्वेचे बहुतेक पादचारी पूल या रचनेचे आहेत. त्रिकोणीय रचनेमुळे पुलावर येणारा ताण तिरक्या लोखंडी खांबातून (मेंबर) पिनमध्ये आणि नंतर उभ्या खांबांमध्ये जातो. त्यामुळे या पुलाला इतर पुलांच्या तुलनेत अधिक हादरे बसतात. हे या पुलांचे वैशिष्ट्य आहे.

या पुलाचे वजन आताच्या पुलांपेक्षा अधिक आहे. प्रवासी ज्यावरून चालतात ते क्राँक्रिटचे असून त्यावर डांबर टाकलेले आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे कमी वजनाचे वजनाने हलके असलेले पूल असतात. मागील ५० वर्षांत मध्य रेल्वेत अशा प्रकारचा एकही पूल बांधला गेला नसल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला.

जुन्या पुलावरून चालताना प्रवाशांना हादरे बसल्यासारखे वाटते. पण कोणत्याही पादचारी किंवा अन्य पुलांना अशा प्रकारचे कमी-अधिक हादरे बसत असतात. त्यामुळे या पुलाबाबतीत घाबरण्यासारखे काहीच नाही. या पुलाप्रमाणेच विभागातील सर्व पुलांची तपासणी वर्षभर सातत्याने होते. आधी सुपरवायझर, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी अशा तीन-चार स्तरांवर ही तपासणी केली जाते. हे रेल्वेच्या पुलांचे वैशिष्ट्य आहे.
- सुरेश पाखरे, वरिष्ठ विभागीय अभियंता, मध्य रेल्वे

Web Title:  Pool at the Pune Railway Station: For 80 years, the crowds stand firm and strong ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.