चाकण : ग्रामपंचायतीनंतर प्रथमच अस्तित्वात आलेल्या चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्वांत तरुण युवती, आर्किटेक्ट पूजा साहेबराव कड यांची, तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र दत्तात्रय गोरे यांची निवड करण्यात आली. चाकण नगर परिषदेवर खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भगवा फडकला.
नगराध्यक्षपदाची निवडणूक कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज नगर परिषदेच्या कार्यालयात पार पडली. शिवसेनेकडून कड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीकडून वृषाली योगेश देशमुख यांनी, तर अपक्षांपैकी उमेदवार मंगल विनोद गोरे यांनी अर्ज दाखल केला.
कड यांना शिवसेनेचे आठ, अपक्ष सहा व भाजपा एक अशा एकूण १५ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले, तर देशमुख यांना केवळ राष्ट्रवादीच्याच सात जणांनी मतदान केले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे यांनी कड निवडून आल्याचे घोषित केले.
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे जीवन सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे राजेंद्र गोरे हे उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. चाकण नगर परिषदेचे अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी अशोक साबळे, मंडलाधिकारी राजाराम मोराळे, तलाठी अशोक सुतार यांनी सहकार्य केले.
यावेळी नगरसेवक प्रकाश लक्ष्मण गोरे, मंगल गोरे, हृषिकेश चंद्रकांत झगडे, स्नेहा वसंत भुजबळ, अश्विता प्रकाश लांडे, अनिता दिलीप कौटकर, स्नेहा नितीन जगताप, शेखर श्रीराम घोगरे, सुरेखा मनोहर गालफाडे, किशोर ज्ञानोबा शेवकरी, मेनका सागर बनकर, सुदाम दामू शेवकरी, नीलेश बबन गोरे, प्रवीण शांताराम गोरे, संगीता दत्तात्रय बिरदवडे, वृषाली योगेश देशमुख, हुमा जहीर आब्बास शेख, जीवन आनंदराव सोनवणे, प्रकाश राजाराम भुजबळ, धीरज प्रकाश मुटके उपस्थित होते.
निवडीबद्दल सुरेश गोरे, प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे, पोलीस निरीक्षक दगडू पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, शहरप्रमुख प्रीतम शिंदे, उपप्रमुख स्वप्नील बिरदवडे, उद्योजक साहेबराव कड, पांडुरंग गोरे, उपसरपंच बाळासाहेब कड उपस्थित होते. (वार्ताहर)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.