खेड तालुक्यात उत्पादकांनी जेसीबी लावून मोडल्या डाळिंबाच्या  बागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 08:15 PM2018-08-11T20:15:17+5:302018-08-11T20:23:11+5:30

डाळिंब पिकाचा उत्पादन खर्चही सुटत नसल्याने अनेक बागायतदारांना डाळिंब बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. परिणामी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

Pomegranate growers planted destroyed by JCB in Khed taluka | खेड तालुक्यात उत्पादकांनी जेसीबी लावून मोडल्या डाळिंबाच्या  बागा

खेड तालुक्यात उत्पादकांनी जेसीबी लावून मोडल्या डाळिंबाच्या  बागा

googlenewsNext
ठळक मुद्देसंततधार पावसामुळे डाळिंब बागांवर तेलकट डाग रोग व पानांवरील काळे डाग या रोगांचा प्रादुर्भाव कृषी विद्यापीठांच्या शिफारसीप्रमाणे डाळिंबाची योग्य अंतरावर लागवड करणे गरजेचे

खेड : मांजरेवाडी येथे डाळिंब पिकावर तेलकट डाग रोग व पानांंवरील काळे डाग या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी डाळिंब बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. पिकाचा उत्पादन खर्चही सुटत नसल्याने अनेक बागायतदारांना डाळिंब बागा उपटून टाकाव्या लागत आहेत. परिणामी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 
मांजरेवाडी येथील किसन मांजरे या सेवानिवृत्त शिक्षकाने ५ वर्षांपूर्वी दोन एकर क्षेत्रात ४५० डाळिंब रोपांची लागवड केली होती. ठिबक सिंचन, वेळच्या वेळी छाटणी करून रोपांची निगा राखण्यात आली होती. तीन वर्षांपासून झाडांना फुलोरा येऊन फळधारणा होत होती; मात्र दरवर्षी जून-जुलै महिन्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे डाळिंब बागांवर तेलकट डाग रोग व पानांवरील काळे डाग या रोगांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी फळांच्या दर्जामध्ये घसरण झाल्यामुळे फळांना बाजारात कमी प्रमाणात मागणी असते. त्यामुळे डाळिंब बागायतदारांचा उत्पादन खर्चही सुटत नव्हता. अखेर यंदा मांजरे यांनी वैतागून जेसीबी यंत्राद्वारे डाळिंबाची सर्व झाडे मुळापासून भुईसपाट केली आहेत. 
................
तेलकट डाग रोग होण्याची कारणे
डाळिंब बागेत जेव्हा वातावरणातील आर्द्रता २५ ते ३० टक्क्यांपेक्षा अधिक होण्यास सुरुवात होते तेव्हा तेलकट डाग रोगाचा प्रसार वाढण्यास सुरुवात होते. सद्यस्थितीत रिमझिम पाऊस पडत असल्याने जमिनीत सातत्याने ओलावा राहात आहे. तसेच पानांवर, फळांवरही ओलसरपणा राहिल्यामुळे तेलकट डाग रोगाला अनुकूल वातावरण निर्माण होते. रोगाच्या नियंत्रणासाठी प्रथम रोगग्रस्त फळे काढून पुरून नष्ट करावीत. नंतर बुरशीनाशकांची फवारणी करावी अशी माहिती सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी दिली. 
फवारणी प्रतिलिटर पाणी 
१) स्ट्रेप्टोसायक्लिन ०.५ ग्रॅम अधिक २ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १-३ डायोल ०.५ ग्रॅम अधिक कॉपर हायड्रोक्साईड २ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. 
 २) आवश्यकतेनुसार पुढील चार दिवसांनी पुन्हा रोगग्रस्त फळे नष्ट करुन स्ट्रेप्टोसायक्लिन ०.५ ग्रॅम अधिक २ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १-३ डायोल ०.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ मि.लि. फवारणी करावी. 

................................
बारामती व इंदापूर तालुक्यातील काही भागात प्रादुर्भाव 
इंदापूर तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील डाळिंबाने शेतकऱ्यांना वैभव प्राप्त करून दिले; मात्र वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे डाळिंबावर तेल्या रोगाने थैमान घातले आहे. काळे तेलकट डाग व फळफुटीमुळे शेतकऱ्यांना लाखोंच्या नुकसानीस सामोरे जाण्याची वेळ आली आहे. महागड्या औषधांचाही परिणाम तेल्यावर होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात खात्रीशीर उत्पन्न म्हणून शेतकऱ्यांनी शेकडो एकरांवर डाळींब बागांची लागवड केली. मध्यंतरी दर पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळींब बागा उखडून काढल्या. माळरानावरील मुरमाड जमीन डाळिंबाला मानवत असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी डाळिंबाकडे वळाला. मात्र, सातत्याने होणारी दराची घसरण आणि आटोक्यात न येणारे रोग यामुळे डाळींब बागांचे क्षेत्र घटू लागले आहे.  कळस परिसरातील डाळींब उत्पादक शेतकरी अमोल ओमासे यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आमच्या परिसरातील शेतकरी तेल्याच्या संकटात सापडला आहे. फळ फुगण्याच्या अवस्थेत असताना तेल्याचे संकट आल्याने, फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

...............

इंदापूर तालुक्यात १५ हजार एकरांवर डाळींब बागा आहेत. कळस, सणसर, शेळगाव परिसरातील काही बागांमध्ये तेल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विद्यापीठांच्या शिफारसीप्रमाणे डाळिंबाची योग्य अंतरावर लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाने १० बाय १५ असे दोन रोपांमधील व ओळींमधील अंतर निश्चित केले आहे. त्यानुसार लागवड केल्यास अंतर मशागती व औषध फवारणी योग्य पद्धतीने करता येते. मात्र, तालुक्यातील बहुतांश बागा या १० बाय १२ किंवा ८ बाय १० अशा चुकीच्या पद्धतीने लागवडी केल्या आहेत. परिणामी, औषध फवारणी योग्य पद्धतीने न झाल्याने तेल्याचा प्रादुर्भाव वाढीस लागतो. 
- सूर्यभान जाधव
तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

Web Title: Pomegranate growers planted destroyed by JCB in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.