‘पीएमपी’ ची बीआरटी मार्गांवरील आयटीएमएस यंत्रणा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 12:24 PM2019-06-22T12:24:14+5:302019-06-22T12:29:00+5:30

पीएमपीकडून बीआरटी मार्गांवर बस संचलनासाठी सुरू करण्यात आलेली इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा कोलमडून गेली आहे.

PMP's ITMS system on BRT routes collapsed | ‘पीएमपी’ ची बीआरटी मार्गांवरील आयटीएमएस यंत्रणा कोलमडली

‘पीएमपी’ ची बीआरटी मार्गांवरील आयटीएमएस यंत्रणा कोलमडली

Next
ठळक मुद्देपीएमपीच्या ६९८ बसमध्ये आयटीएमएस यंत्रणाबीआरटी स्थानकातील एलईडी यंत्रणा बंद

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)कडून बीआरटी मार्गांवर बस संचलनासाठी सुरू करण्यात आलेली इंटिलिजंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही यंत्रणा कोलमडून गेली आहे. एकुण ६९८ बसपैकी अनेक बस या यंत्रणेमध्ये दिसतच नसल्याचे समोर आले आहे. सर्व बीआरटी स्थानकातील एलईडी यंत्रणा बंद पडली आहे.
पीएमपीच्या ६९८ बसमध्ये आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे बीआरटी बसमार्गावरील बसची प्रवाशांना अचूक माहिती देणे, मार्गावरील बसचा वेग नियंत्रण कक्षामार्फत नियंत्रित करणे, चालकाशी प्रत्यक्ष संपर्क साधणे, बसथांब्यांची उद्घोषणा करणे, बस वेळेवर धावण्याबाबत कक्षाकडून नियंत्रण करणे असे विविध फायदे आहेत. पण सध्या यापैकी एकही हेतु साध्य होताना दिसत नाही. या यंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीचे काम एनईसी या संस्थेकडे देण्यात आले आहे. मात्र, फेब्रुवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत संस्थेने काम केलेले नाही. त्यामुळे ६९८ पैकी दररोज सरासरी केवळ ३५० बसचा अहवाल होत असून सरासरी केवळ ३० बसचे मार्ग निवडले जात आहेत. दि. २२ मार्च पासून बीआरटी मार्गावरील सर्व बसस्थानकातील एलईडी यंत्रणा बंद पडली आहे. बसमधील एलईडीवर दिसणारे बस स्थानक आणि प्रत्यक्षातील बस स्थानकामध्ये तफावत आढळून येते. याबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारी पीएमपीकडे आल्या आहेत. यंत्रणा दुरूस्त करण्यासाठी साहित्य उपलब्ध नसून ते २ ते ५ महिन्यांनी मिळेल, असे एनईसीने लेखी कळविले असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मार्गावर प्रत्यक्षात धावलेल्या बसचे किलोमीटर व एनईसीच्या अहवालातील किलोमीटर यामध्ये तफावत आढळून येते. अहवालांमधून अपुरी माहिती मिळत आहे. सॉफ्टवेअर माहिती प्रत्यक्षातील माहितीशी जुळत नाही. मोबाईल अ‍ॅप पुर्ण क्षमतेने कार्यरत नाही. याबाबत एनईसीला वेळोवेळी कारणे दाखवा नोटीसही देण्यात आले आहे. यंत्रणेत सुधारणा होत नसल्याने संस्थेचे बील देण्यात आलेले नाही. करारातील तरतुदीनुसार यंत्रणेत सुधारणा केल्यास थकीत बिल दिले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: PMP's ITMS system on BRT routes collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.