जुन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच आराखडा तयार करणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:03 PM2019-02-19T14:03:55+5:302019-02-19T16:27:14+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या जुन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

A plan will prepare for the over all development of Junnar area soon : Chief Minister Devendra Fadnavis | जुन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच आराखडा तयार करणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

जुन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच आराखडा तयार करणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

Next
ठळक मुद्दे२८० कोटी अष्टविनायक रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा

पुणे:   सनई- चौघाडे, तुतारीचे स्वर, भगवे, ध्वज , फेटे, फुलांची सजावट , जय भवानी जय शिवाजी यांसारख्या घोषणांचा गगनभेदी नाद, अशा मंगलमय वातावरणात मंगळवारची पहाट शिवेनरीवर उजाडली. सर्वांना उत्सुकता होती. स्वराज्याच्या सुंदर स्वप्नांची आशा जागविणाऱ्या व त्यांना पूर्णत्वास नेणाऱ्या लाडक्या शिवबाच्या जन्मोत्सवाची..राजकीय नेते मंडळी , सामाजिक कार्यकर्ते आणि शिवरायांवर निस्सीम प्रेम करणारे स्वराज्य बांधव यांनी शिवनेरी जणू न्हाऊन निघाली होती... शिवजन्म काळ जवळ येताच उपस्थित माता भगिनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळणा जोजवून शिवरायांचे जन्मोत्सव साजरा केला.  
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनावणे , पत्रकार उदय निरगुडकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. त्यानंतर ओझर येथे हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ आज ओझर येथे करण्यात आला. 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. या तालुक्याला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पार्श्वभूमी , वन्यजीव आणि मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपन्नता लाभलेली आहे. तसेच महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून राज्य सरकारतर्फे घोषित करण्यात आला आहे. तसेच दाºया घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. तसेच आंबेगव्हाण येथे बिबटया सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुक्यातील बुडीत बंधा?्याला मान्यता देण्यास प्राधान्य देण्यात येईल.त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे केले. 
कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश पूजन व शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओझर गणपती मंदिर ट्रस्टतर्फे एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुरस्कार्थी राहुल बनकर यांच्यातर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद बनसोडे यांनी तालुक्याच्या विकासास सहाय्य्यभूत ठरणाऱ्या विकास कामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली. पत्रकार उदय निरगुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        प्रकल्पातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग हा पुणे जिल्ह्यातील मोरगाव, सिध्दटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री व थेऊर या सहा अष्टविनायक तीर्थक्षेत्र जोडणा-या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग आहे. दरवर्षी या रस्त्यांवरून १० लक्ष भाविक यात्रा करतात. हे रस्ते ग्रामीण तसेच शहरी भागातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान, बारामती तालुक्यातील मोरगाव, दौंड तालुक्यातील पाटस दौंड मार्गे सिध्दटेक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, जुन्नर तालुक्यातील ओझर व लेण्याद्री व हवेली तालुक्यातील थेऊर ही महत्त्वाची तीर्थस्थाने व बाजारपेठेची गावे आहेत.या रस्त्यांवर वाहतूक वर्दळ बऱ्यांच प्रमाणात असते व त्यामानाने डांबरी पृष्ठभागाची रुंदी अपुरी पडते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे.  या भागातील पर्यटन व शेतीमालाच्या वाहतुक वाढीस चालना मिळणार आहे.
    

Web Title: A plan will prepare for the over all development of Junnar area soon : Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.