हिवाळ्यातल्या मिनी-व्हॅकेशनसाठी पुण्याजवळची ही ठिकाणं निवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 11:48 PM2017-11-19T23:48:48+5:302017-11-20T13:10:41+5:30

हिवाळ्यात आता शाळांना ख्रिसमस व्हॅकेशन मिळेल आणि तेव्हा ही ठिकाणं तुम्ही नक्कीच फिरून येऊ शकता.

places in pune for winter vacations | हिवाळ्यातल्या मिनी-व्हॅकेशनसाठी पुण्याजवळची ही ठिकाणं निवडा

हिवाळ्यातल्या मिनी-व्हॅकेशनसाठी पुण्याजवळची ही ठिकाणं निवडा

Next
ठळक मुद्देपुण्यापासून काही अंतरावर आत काही अगदी शांत हॉटेल्स आहेत. नेहमीच्या धकाधकीतून या ठिकाणी जास्त शांतता मिळेल. इथे आपल्याशिवाय इतर कोणीही असणार नाही.

पुणे - गुलाबी थंडी हळूहळू राज्यभर पसरतेय. हिवाळा सुरू झाला की भटकणाऱ्या लोकांचे प्लॅनिंग सुरू होतात. यंदा कुठे जायचं? आपल्या बजेटमध्ये आपल्याला कुठे-कठे जास्तीत जास्त मजा करता येईल? नेहमीच्या धकाधकीतून कोणत्या ठिकाणी जास्त शांतता मिळेल, जिथे आपल्याशिवाय इतर कोणाचाही त्रास होणार नाही. अशी शांत ठिकाणं शोधण्यासाठी बाहेरगावी किंवा परदेशात जाण्याची गरजच नाही. तुम्ही थोडीशी नजर इकडे-तिकडे वळवली तरी तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला कितीतरी शांत ठिकाणं आहेत, जिथे तुम्हाला या गुलाबी थंडीचा यथेच्छ आनंद उपभोगता येईल. पुण्यात अशीच काही शांत ठिकाणं, बंगले आहेत, जिथे गेल्यावर तुम्ही तुमचा नेहमीच थकवा तर विसरालच शिवाय हुडहुडणाऱ्या थंडीचाही आस्वाद घेऊ शकाल. 

दि इवी हाऊस, खडकवासला

पुण्यापासून १९ किमी आत असलेला एनडीए-संगरुन मार्गावर असलेला दि इवी हाऊस खडकवासला हे अगदी शांत हॉटेल आहे. शहराच्या गजबाजाटापासून आतमध्ये असल्याने आपण लांब कुठेतरी आलोय असा भास इकडे आल्यावर होतो. मोठ-मोठ्या खिडक्यांच्या या बंगल्यात प्रशस्त खोल्याही आहेत. शातं वातावरण, मधाळ हवा आणि ऐसपैस जागा यामुळे इकडे आल्यावर नक्कीच एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. ही जागा एखाद्या जोडप्यासाठीही तितकीच रोमँटीकही आहे. त्यामुळे तुम्हाला या हिवाळ्यात तुमच्या प्रियजनासोबत लांब जायचं असेल तर दि इवी हाऊसचा विचार करायला हरकत नाही. 

दि इव्हरशाईन केज प्रिझ्मा रिसॉर्ट, महाबळेश्वर

हिवाळ्यात धुक्याच्या सकाळी आपल्या खिडकीच्या बाहेर डोकावल्यावर छान हिरवी गार पसरलेली झाडं, डोंगररांगा आणि वाहत जाणारी नदी असं विहंगम दृष्य पाहायला कोणाला आवडणार नाही? अगदी असाच अनुभव घ्यायचा असेल तर महाबळेश्वरच्या दि इव्हरशाइन केज प्रिझ्मा रिसॉर्टला एकदा नक्की भेट द्या. बेडरुममधूनच विहंगम दृष्यांचा अनुभव मिळत असेल तर परदेशात जाण्याची गरजच काय? प्रशस्त बेडरुम, वायफाय, टीव्ही, २४ तास होम सर्व्हिस आणि बाहेरचा सुंदर नजारा यामुळे तुमचा हिवाळा इकडे नक्कीच आनंदात जाऊ शकतो.

जाधवगड फोर्ट

तुम्हाला एकदम जुन्या काळातील वास्तूत राहण्याची इच्छा असेल तर जाधवगड फोर्ट एकदम बेस्ट आहे. डॉ. कामत यांनी १७ आणि १८ व्या शतकातील अनेक वस्तूंचं कलेक्शन इथे ठेवलेलं आहे. त्यामुळे इथे राहायला आल्यावर आपण जुन्या काळात गेल्याचाच भास होतो. प्रशस्त राजवाड्यात राजेशाही थाटातलं जेवणं करायला कोणाला आवडणार नाही? तुम्हालाही हा राजेशाही थाट अनुभवायचा असेल तर यंदाच्या हिवाळ्यात इकडे नक्की भेट द्या. जुन्या गोष्टी एकत्र करत त्यांनी आई वास्तुसंग्रहालयही उभारलं आहे. त्यामुळे इतिहासातील अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला होईल. 

प्रिन्सेस विस्टा, लोणावळा

यंदाच्या हिवाळ्यात लोणावळ्यात जात असाल तर प्रिन्सेस विस्टाला नक्की भेट देऊन या. स्विमिंग पुलमध्ये बसून आजूबाजूच्या डोंगररांगांचा यथेच्छ आनंद तुम्ही घेऊ शकता.  याठिकाणी तुम्हाला रुममध्ये किचन, बाथरुम, एसी रुम आणि रुमच्या बाहेर प्रशस्त स्विमिंग पूल मिळेल. सगळ्याच सुविधा एकाच रुममध्ये असल्याने आपल्याच रुममध्ये बसून आपण आपला विकेंड आनंदात साजरा करू शकू. एवढंच नव्हे तर बंगल्याच्या टेरेसवर जाऊन थंडगार हव्याचा आनंदही घेऊ शकता. टेरेसवरून आजूबाजूचा परिसर न्याहाळताना आपण जंगालाच्या कुशीतच आलो आहोत असा भास होतो. 

Web Title: places in pune for winter vacations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.