पुणेरी पाट्यांचे आजपासून प्रदर्शन, अस्सल पुणेरी अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:15 AM2018-06-23T01:15:31+5:302018-06-23T01:15:42+5:30

पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पुणेकर रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Performance from Puneer Patni today | पुणेरी पाट्यांचे आजपासून प्रदर्शन, अस्सल पुणेरी अनुभव

पुणेरी पाट्यांचे आजपासून प्रदर्शन, अस्सल पुणेरी अनुभव

Next

पुणे : पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पुणेकर रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणेकर जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी आपली स्वत:ची ओळख निर्माण करतात. पुणेकरांचा अभिमान पुणेरी पाट्यांच्या सर्वांत मोठ्या प्रदर्शनातून झळाळून निघणार आहे. २३ आणि २४ जून रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत यशवंतराव चव्हाण कलादालनामध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांच्या अभिमानाचा आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सहयोगाने शनिवारी आणि रविवारी ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी’ सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक, आमदार अनंत गाडगीळ, आमदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, महाराष्टÑ साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
‘आम्ही खाण्याचे पैसे घेतो; अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही’, ‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’, ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत; त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही’, ‘आमचं कुत्र ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या, की तुम्ही नक्की पुण्यातच आहात हे सुज्ञास सांगणे न लगे! पुणेकर पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवतो. चपखल शब्दांमधून मार्मिक टिप्पणीही झळकते याच पाट्यांमधून..! याला वयाचे बंधन नाही, शिक्षणाची अट नाही. अगदी एखादा मुलगाही मार्मिक शब्दांत भलामोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही ‘या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो’असे म्हणू शकतात.
>खडूस, खत्रूड, खवचट व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकरांची तैलबुद्धी दाखवतात व त्यांचा खास पुणेरी बाणाही! हा बाणा प्रदर्शनातून खास पद्धतीने अनुभवता येणार आहे.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शनिवार (दि. २३ जून) आणि रविवारी (दि. २४ जून) सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

Web Title: Performance from Puneer Patni today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे