Pawar's will be Shock when i am tell parth's bad habits : Prakash Ambedkar | नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल : प्रकाश आंबेडकर 
नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल : प्रकाश आंबेडकर 

ठळक मुद्देभाजपा-कॉंग्रेसकडून नोटांद्वारे प्रचार : आपल्या वंचित असण्याला आपणही जबाबदार

पुणे : ‘‘शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा,’’ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले.
 पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शेवटची प्रचारसभा आंबेडकरांनी रविवारी (दि. २१) पुण्यात घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अनिल जाधव (पुणे) आणि नवनाथ पडळकर (बारामती) या उमेदवारांसह आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते. 
डॉ. आंबेडकर म्हणाले, की देशात घराणेशाहीचे राजकारण सुरु आहे. लोकशाही फुलवायची तर घराणेशाही संपली पाहिजे. जात, धर्म आणि वर्गाच्या वर्चस्वाच्या मक्तेदारी संपविणे आवश्यक असून जनतेने आपले मत विकू नये. कारण, मत विकत घेणाºया उमेदवाराची बांधिलकी पैसे घेणारांसोबत राहात नाही तर त्याच्यासाठी पैसे लावणाऱ्यासोबत असते.
  ‘‘निवडणूक प्रचार बंद झाल्यानंतर दोन प्रमुख पक्षांकडून नोटांचा प्रचार सुरु होईल. मत विकत घेतले गेल्यामुळेच शहरांचा आणि झोपडपट्यांचा पाणी, वीज या पलीकडे विकास झाला नाही. आपण वंचित राहिलो याला आपणच जबाबदार असून एका दिवसाची दिवाळी करायची की भविष्यकाळ उज्ज्वल करायचा हे आपण ठरवायला हवे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे,’’ असा दावा आंबेडकरांनी यावेळी केला. 
महात्मा गांधींना गोळ्या घालणारी मानसिकता आजही जिवंत असून गांधींच्या हत्येनंतर इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या जातात. याच मानसिकतेचे उमेदवार पुण्याच्या रिंगणात उतरलेले आहेत. संविधान बदलणाºयांना जागा दाखवून द्या, असे अवाहन डॉ. आंबेडकरांनी केले. सत्ता आल्यास संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना कारागृहात डांबणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
..................
मोदींना ताकदीने भेटणार
‘‘इंदूमिलच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदी म्हणाले, ‘तुम्ही मला भेटत नाही.’ असे विचारणाऱ्या मोदींना आता 23 मे नंतर ताकदीने भेटणार,’’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले. देशाची मालमत्ता मोदी कवडीमोल भावाने विकताहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

.................
खरी लढाई भाजपसोबत
‘‘लोकसभा निवडणूकांच्या जागा वाटपाबाबत मी बैठकीला बसा म्हणत असताना कॉंग्रेसवाल्यांनी दुर्लक्ष केले. पुण्यात काँगेसला उमेदवार मिळत नव्हता. शेवट मोहन जोशींना ‘बळीचा बकरा’ बनविण्यात आले. राज्यात कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर जाणार असून खरी लढाई भाजप आणि वंचित आघाडीमध्येच होणार आहे. आम्ही कॉंग्रेसशी भांडू, दोन हात करु पण भाजपासोबत जाणार नाही,’’ असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.  
  


Web Title: Pawar's will be Shock when i am tell parth's bad habits : Prakash Ambedkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.