‘पाडवा वाचना’ने जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:41 AM2018-03-19T00:41:20+5:302018-03-19T00:41:20+5:30

गुढी पाडव्याचा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. अंगणामध्ये सडासारवण करुन आकर्षक रांगोळी काढून उंच गुढी उभारण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.

'Padwa reading' welcomes New Year in the district | ‘पाडवा वाचना’ने जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत

‘पाडवा वाचना’ने जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत

Next

पुणे- गुढी पाडव्याचा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. अंगणामध्ये सडासारवण करुन आकर्षक रांगोळी काढून उंच गुढी उभारण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक आणि पाहुण्यारावळ्यांना शुभेच्छा देणे हे अगत्याचे असते. यासोबतच गावोगावच्या ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये ‘पाडवा पंचांग वाचन’ केले जाते. या पाडवा वाचनामधून जुनीजाणती आणि बुजुर्ग मंडळी गावातील
पुजारी व ब्राह्मणांच्या साक्षीने नव्या वर्षाचे भाकित वर्तवितात. येणारे वर्ष कसे असेल, शेतक-यांसाठी हे वर्ष नेमके काय घेऊन येणार आहे, पाऊस कसा राहील, हवामान कसे राहील आदी बाबींचा आडाखा या भविष्य कथनामधून मांडण्यात आला. यासोबतच जिल्ह्यामध्ये बहुतांश नागरिकांनी घरांवर भगव्या पताका आणि भगवे ध्वज उभारल्याचेही पहायला मिळाले.
>बेल्ह्यात गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत
बेल्हा : येथे व परिसरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने घरोघरी साजरा करण्यात आला. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तसेच उत्तम आरोग्याची मनोकामना करीत घरे, दुकाने व गाड्यांवरही गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढीची पुजा करण्यात आली. गुढीला नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच काही नागरिकांनी चारचाकी व दुचाकीगाड्यांवर देखील गुढ्या उभारल्या होत्या. तसेच दुकानांवरती देखील गुढ्या उभारल्या होती. लहान मुलांनी साखरेच्या गाठ्या गळ्यात घातल्या होत्या. पाडव्याचा आनंद साजरा करतानाच उत्तम आरोग्य, शेतक-यांसाठी अच्छे दिन आणि प्रगतीसाठी प्रार्थनाही करण्यात आली.
गुलालाची उधळण करीत पाडवा साजरा
न्हावरे : येथे हर हर महादेवच्या गजरात गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या निनादात आज गुढीपाडवा निमित्त कावड सोहळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त रविवारी श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्री महापुजा व अभिषेक करण्यात आला.
४मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे आलेगाव पागा येथील भीमा नदी वरील भीमाशंकर मंदिराकडे प्रस्थान झाले. भीमानदीवर श्रींच्या मुर्तींना अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर कावड सोहळा आलेगाव पागा, घोडगंगा कारखाना मार्गे न्हावरे कडे प्रस्थान झाला. तांबे वस्ती, आलेगाव पागा, बहिरट वस्ती भोसले वस्ती, शितोळे वस्ती, बिडगर वस्ती, घोडगंगा कारखाना येथील भाविकांनी कावडीचे स्वागत करत श्रींचे दर्शन घेतले. न्हावरे येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचक्रोशीतील तरूणांनी, भाविकांनी कावड खांद्यावर घेऊन नाचवली.
या प्रसंगी अनेकांनी कावडीला नवसाची तोरणे अर्पण केली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी मंदिरात उपसरपंच अनिल भुजबळ यांच्या हस्ते अढी पूजन करण्यात आले. तर नवीन वर्षाच्या पंचागाचे पूजन प्रकाश रिसबूड व राजेंद्र पारखे यांनी केले.
या वर्षी पर्जन्यमान चांगलं राहील खरीप पिके चांगली येईल, रब्बी हंगामातील पिकांना थोडा फटका बसेल, रोगराई वाढेल, चोर व आगी पासून जनतेला फटका बसेल असे या वर्षीचे भाकीत अढी पूजनातून व पंचांग वाचनातून वर्तविण्यात आले. दरम्यान अढी पुजन व पंचाग वाचन ऐकण्यासाठी परिसराततील नागरिक उपस्थित होते. पंचांग वाचनामधून हवामानाचा काय अंदाज येतो हे ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.


गोड जेवणाने पाडवा उत्साहात साजरा
आंबेठाण : गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आंबेठाण परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला खरेदीची लगबगही पाहायला मिळाली. परिसरामध्ये घरोघरी गुढी उभारुन गोडधोड जेवण करण्यात करण्यात आले होते. तसेच आसपासच्या गावांमध्ये पाडवा वाचन करून हवामानाचा अंदाज पाहण्यात आला. ग्रामदैवताच्या मंदिरात एकत्र येऊन पाडवा वाचन केले गेले. आंबेठाण येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिरावर गुढी उभारण्यात आली. यावेळी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पदाधिकारी, देवाचे पुजारी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना लिंब-गुळाचे मिश्रणाचा प्रसाद वाटण्यात आला.

बळीराजा सुखावणार असल्याचे भाकीत
दावडी : या वर्षी पाऊस चांगला होणार, धान्य उत्पादन वाढणार, पशुपालन वाढणार, लोक सुखी होणार, रोगराईत वाढ होणार असे भाकीत दावडीच्या पाडवा वाचनात करण्यात आले. महालक्ष्मी मंदिरांत ग्रामस्थानी देवतांची पूजा केली . पुढील वर्षी पाऊस पाणी प्रमाणात पडणार आहे. खरिपांचे धान्य उत्पादन वाढणार आहे. पाऊस वाण्यांच्या घरी विसवणार आहे . गाई, गुरे यांचे आरोग्य चांगले राहून दुध उत्पादनांत वाढ होणार आहे. रोगराईत वाढ होणार आहे, भांडणे वाढतील. अशा प्रकारचे भाकित पुरोहित यांनी सांगितले. दावडीचे उपसरपंच संतोष गव्हाणे, आत्माराम डुंबरे, अंनत दुंडे, केरभाऊ म्हसाडे, मारुती बोत्रे, खंडु गावडे, रामदास बोत्रे, बाळासाहेब कान्हुरकर, सुरेश म्हसाडे, दत्ता सातपुते, यांच्यासह दावडी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरात पाडवा वाचन करण्यात येते. पाडवा वाचन ऐकण्यासाठी दावडी परिसरातील आमराळवाडी, लोणकरवाडी, डुंबरे वस्ती,कान्हुरकरमळा, गव्हाणे वस्ती, दिघेवस्ती, जाधवदरा ठाकरवाडी येथील ग्रामस्थ आले होते.

राजुरीमध्ये सांस्कृतिक शोभायात्रा
राजुरी : मराठी नवीन वर्षानिमीत्त शरदचंद्र पतसंस्थेच्यावतीने शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभा यात्रेत पारंपारिक पध्दतीने वेशभुषा परिधान केलेले नागरिक, उंट ,घोडे, हत्तींचा समावेश करण्यात आला होता. दुचाकी रॅलीमध्ये महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. बैलगाडया, टॅक्टर घेऊन नागरिक सहभागी झाले होते. वाजत्री, गोंधळी, मावळे, ढोल लेझिम, टिप-या खेळत तसेच संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज मुक्ताईमाता सोपानदेव, निवृत्तीनाथ महाराज हयांची वेशभुषा केलेल्या तरुण आणि मुलांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत, छत्रपती शिवाजीमहाराज की जय अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. आमदार शरद सोनवणे ,अमीत बेनके, दिपक औटी, सरपंच माऊली शेळके , पतसंस्थेचे अध्यक्ष जि. के. औटी, नरेंद्र गटकळ, चंद्रकांत जाधव, ए. डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, वल्लभ शेळके उपस्थित होते.
डोर्लेवाडीत भगव्या पताका
डोर्लेवाडी : जुनी परंपरा मोडीत काढून डोर्लेवाडीत नागरिकांनी घरांसमोर गुढी म्हणुन फक्त भगवे झेंडे उभारुन त्यावर साखर गाठी लावून गुढीपाडवा सण साजरा केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यादिनानिमित्त भगव्या पताका उभारून पाडव्या दिवशी मानवंदना दिली.
>महालक्ष्मी मंदिरामध्ये ग्रामस्थांचा उत्साह
दावडी : येथील ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिरामध्ये पंचांग आणि पाडवा वाचनाचा कार्यक्रम पार पडला. पुढील वर्षी धान्य उत्पादन, पाऊस पाणी, दुध दुभते, भांडणे, रोगराई कशी राहिल, कोणती पिके चांगली येतील या विषयी पुरोहित नंदकुमार भदे यांनी पाडवा वाचन केले. दावडीचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे यांनी पंचाग पुजन केले. पाडवा वाचन ऐकण्यांसाठी दावडी परिसरातील आमराळवाडी, लोणकरवाडी, डुंबरे वस्ती, कान्हुरकरमळा, गव्हाणे वस्ती, दिघेवस्ती, जाधवदरा ठाकरवाडी येथील ग्रामस्थ आले होते. यावेळी मंदिरातील देवतांची पुजा करण्यात आली. यावेळी दावडीचे उपसरपंच संतोष गव्हाणे, आत्माराम डुंबरे, सुरे डुंबरे, अंनत दुंडे, केरभाऊ म्हसाडे, मारुती बोत्रे, खंडु गावडे, रामदास बोत्रे, बाळासाहेब कान्हुरकर, सुरेश म्हसाडे, दत्ता सातपुते ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: 'Padwa reading' welcomes New Year in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.