इंडिया सुपर मॉम’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 06:25 AM2019-07-22T06:25:34+5:302019-07-22T06:25:40+5:30

देशभरातून आलेल्या महिलांची फसवणूक : आयोजक फरार

organizer fraud to women to participate in 'India Super Mom' | इंडिया सुपर मॉम’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना गंडा

इंडिया सुपर मॉम’ बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना गंडा

Next

विवेक भुसे/सुरेश वांढेकर

पुणे/ वाघोली : ‘इंडियाज सुपर मॉम’ निवडण्यासाठी देशभरातून गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात ४४ महिला आल्या़ रविवारी सायंकाळी त्यांची अंतिम फेरी होणार होती़ त्यापूर्वीच आयोजक, त्यांचे कर्मचारी फरार झाले आहेत. या स्पर्धकांनी लोणीकंद पोलिसांशी संपर्क साधला़ परंतु, त्यांनी जेथे याची सुरुवात झाली, तेथील पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगण्यात आले आहे़ त्यामुळे सुपर मॉम बनण्याचे स्वप्न पाहून पुण्यात आलेल्या महिलांचे हे स्वप्न स्वप्नच राहून त्यांची फसवणूक झाली आहे.

तुहिन दास आणि तनुश्री  दास अशी फसवणुक करणाऱ्यांची नाव असल्याचे त्यांच्याकडे काम करणाऱ्या तरुणाने सांगितले़ याबाबत स्पर्धक व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेली माहिती अशी,‘इंडियाच फस्ट सुपर मॉम’ या नावाने सौदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आयोजकांनी पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बंगलोर,  अहमदाबाद येथे एक ते दीड वर्षांची मुले असलेल्या महिलांची स्पर्धा घेतली़. त्यांचे व्हिडिओ केले़ ते फेसबुक व इतरत्र टाकून त्याची जोरदार जाहीरात केली़. त्यांच्याकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेतले. त्यातून त्यांनी देशभरातून ४५ महिलांची निवड केली. त्यांची अंतिम फेरी पुण्यात रविवारी २१ जुलै रोजी हडपसर येथील लॉन्समध्ये होणार असल्याचे जाहीर केले.

या सोहळ्यासाठी त्यांनी अनेक नामवंत कंपन्यांचे प्रायोजकत्व मिळविल्याचे त्यांच्या फेसबुकवरील पोस्टवरुन दिसून येते. या सोहळ्यात लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहेत. या अंतिम फेरीसाठी कृणाल कपूर, सुधाचंद्रन, रुसलान मुमताज व इतर अनेक नामवंत ज्युरी असणार असल्याचे त्यांनी केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमासाठी त्यांनी ४९९ ते १० हजार रुपयांपर्यंतची तिकीटे ठेवली होती.
या निवड झालेल्या ४४ महिलाची दोन दिवस वाघोलीजवळील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सोय करण्यात आली होती़ त्यानुसार देशभरातील विविध शहरातून ४४ महिला व त्यांचे पती या वाघोलीतील या हॉटेलमध्ये आले. हॉटेल बुकींग ऑनलाईन करावे लागत असल्याने त्यांचे त्यांनी पैसे भरले होते.

रविवारी सायंकाळी हे सर्व स्पर्धक व त्यांचे नातेवाईक ग्रँड फिनाले पाहण्यासाठी हडपसर येथील लॉन्सवर गेले. तेव्हा तेथील सुरक्षारक्षकांनी येथील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. या दोघांसाठी एक तरुण व त्यांची बहिण पुण्यात काम करीत होती. लोकमत प्रतिनिधीने रात्री अकरा वाजता वाघोलीतील हॉटेलवर जाऊन स्पर्धक महिला व या तरुणाची भेट घेतली. त्याने सांगितले की, गेल्या दीड महिन्यांपासून मी या दोघांसाठी काम करीत असून तुहिन दास याने आपल्याकडूनही सुमारे साडेचार लाख रुपये घेतले. शो संपल्यावर आपल्याला भरपूर पैसा मिळणार असल्याने तुझे पैसे २० टक्के व्याजाने परत करीन असे सांगून पैसे घेतले होते. या दोघांनी देशभरातील अनेक शहरांमध्ये ऑडिशन घेतल्या. त्यात सहभागी झालेल्या महिलांकडून त्याने २० हजार, ३० हजार, ५० हजार रुपये असे
प्रत्येकीकडून वेगवेगळी रक्कम घेतली आहे. सुमारे ३० लाख रुपयांची या दोघांनी फसवणूक केल्याचे या तरुणाने सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी सेट उभा करणाऱ्याने अ‍ॅडव्हास न दिल्याने तेथे सेट उभा केला नाही़. तेथे काहीही नव्हते, असे आम्ही सायंकाळी जाऊन पाहिले
तेव्हा दिसून आले. हे दोघे दुपारपासून गायब असून त्यांचे सर्व मोबाईल बंद आहेत. त्यांनी फेसबुक व इतर ठिकाणी टाकलेल्या सर्व पोस्ट डिलिट करुन टाकल्या आहेत.

या सर्व प्रकाराची माहिती मिळाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे समजताच अनेक महिलाना रडू कोसळले. याबाबत महिलांनी सांगितले की, आमच्या प्रत्येकीकडून त्यांनी २० हजार रुपये घेतले. याशिवाय ग्रॅड फिनालेसाठी ड्रेसपासून विविध खर्च आम्हाला
करायला लागल्याने प्रत्येकीचा जवळपास ५० हजार रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील स्पर्धक महिलांच्या नातेवाईकांनी आम्ही उद्या पुण्यातील सायबर पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार करणार असल्याचे सांगितले.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले की, आमच्या हद्दीतील हॉटेलमध्ये काही स्पर्धक उतरले होते. त्यांच्या पैकी एका संयोजकाची गाडी अडविली तसेच फसवणूक झाल्याची तक्रार देण्यासाठी काही जण आले होते. ही घटना ज्या ठिकाणी सुरु झाली. तेथील पोलिसांशी संपर्क करुन तक्रार देण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

Web Title: organizer fraud to women to participate in 'India Super Mom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.