म्हापसा, दि. ३ - सुप्रसिद्ध अशा कळंगुट येथील भागात गुरुवारी पहाटे घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात पुण्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र अपघातात जखमी झाला. 
विमल नगर पुणे येथील रहिवाशी पूर्वेश शहा (३७) हा आपला मित्र लोकनाथ प्रसाद  (पुणे) याच्यासोबत गाडी होंडा अ‍ॅक्वॉर्ड क्र. एमएच ०२ बीएम २२०९ घेऊन कळंगुटच्या दिशेने जात होता. बेदरकारपणे सुसाट गाडी चालवणाऱ्या पूर्वेश शहा याचा आपल्या वाहनावरील नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर त्याची जोरदार टक्कर बसली व गाडी बाजूला कोलमडली. त्याच्या शेजारी बसलेल्या लोकनाथ प्रसाद यांनी कळंगुट पोलिसांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी दाखल  होऊन दोघानांही वाहनातून बाहेर काढले व जवळच असलेल्या कांदोळी येथील आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले. तेथे पूर्वेश शहा याला मृत घोषीत करण्यात आले. यावेळी केंद्रावर लोकनाथ प्रसाद याची मद्यार्क चाचणी घेण्यात आली. त्यावेळी तो दारूच्या नशेत  असल्याचे आढळून आले. 
पूर्वेश शहा याच्या मृतदेहावर शवचिकित्सा करण्यात आली असून त्याचा अहवाल राखून ठेवण्यात आल्याची माहिती निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली आहे. त्याचा मृतदेह नंतर त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार झाडावर ठोकर मारण्यापूर्वी सदर वाहनाने एका पादचाºयाला सुद्धा ठोकर मारुन जखमी केले होते. जखमी पादचाऱ्यावर नंतर प्राथमिक उपचार करुन त्याला घरी पाठवण्यात आले. सदर प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीष पाडलोस्कर पुढील चौकशी करीत आहेत. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.