महाविद्यालयात उधळला जाणार निवडणुकीचा गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 07:50 PM2018-06-21T19:50:41+5:302018-06-21T19:55:48+5:30

राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार आहे.

once again election in college | महाविद्यालयात उधळला जाणार निवडणुकीचा गुलाल

महाविद्यालयात उधळला जाणार निवडणुकीचा गुलाल

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थी निवडणूकांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना महाविद्यालयात चंचू प्रवेश करण्याची संधी मिळणार

पुणे: नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ व महाविद्यालयांमधील विद्यार्थी निवडणुका खुल्या पध्दतीने घेण्याची तरतुद करण्यात आली असून त्यासंदर्भातील परिनियम राज्य शासनास सादर करण्यात आले आहेत.राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमधूनच नेतृत्व करण्याची संधी मिळावी या उद्देशाने राज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या निवडणुका खुल्या पध्दतीने घ्याव्यात अशी मागणी विविध स्थरातून केली जात होती. तर विद्यार्थी निवडणूकामुळे महाविद्यालयात वाद निर्माण होतात.त्यामुळे निवडणूका घ्यायच्याच असतील तर सर्व खबरदारी घ्या, अशी मागणी प्राचार्य व प्राध्यापक संघटनांकडून केली जात होती.त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनांकडूनही त्यावर उलटसुलट चर्चा केली जात होती.मात्र,यंदा या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकीचे वारे वाहिलेले पाहायला मिळणार आहे.
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनाच या निवडणूकीचा भाग होता येणार आहे. तसेच राजकीय पक्षांना या निवडणुकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान,विद्यार्थी निवडणुकांसहित इतर विषयासंदर्भातील परिनियम जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी यांच्या समितीने तयार केले असून शासनास सादर केले आहेत.निवडणुकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये,अशी शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे.त्यामुळेच विधी व न्याय विभागाकडून विद्यार्थी निवडणुकांचे परिनियम तपासून झाल्यानंतर जुलै महिन्यात निवडणुका घेण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे,असेही सूत्रांनी सांगितले.
------------
प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थी निवडणुकांचे स्वागतच केले आहे. मात्र,राजकीय पक्ष किंवा झुंडशाही पध्दतीने महाविद्यालयाच्या आवारात घुसणा-यांना रोखण्याचे अधिकार प्राचार्यांकडे नाही.त्यामुळे विद्यार्थी निवडणुकांची जबाबदारी प्राचार्य व प्राध्यापकांकडे न देता महसूल किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी. पोलीस व महसूल यंत्रणेच्या सहकार्यानेच विद्यार्थी निवडणुका शांततेत पार पडू शकतील.
प्रा.नंदकुमार निकम,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
-----------------------
प्राध्यापक संघटनेने कधीही विद्यार्थी निवडणुकांना विरोध केला नाही. मात्र,प्राचार्य व प्राध्यापकांकडे अधिकार नसल्याने निवडणूकीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या आवारात अनुचित प्रकार घडतात.तसेच विद्यार्थी निवडणूकांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना महाविद्यालयात चंचू प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे.विद्यार्थी निवडणुका वगळता सर्वच निवडणुका महसूल व सहकार विभागाकडून घेतल्या जातात.त्यामुळे विद्यार्थी निवडणुका सुध्दा स्वतंत्र यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे.
प्रा.एस.पी.लवांडे,सचिव ,एम.फुक्टो, महाराष्ट्र 
.........................
विद्यार्थी निवडणुकीसंदर्भातील परिनियम विधी व न्याय विभागाकडे असून ते मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत.लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयात खुल्या विद्यार्थी निवडणुका घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.महाविद्यालय प्रवेशाची अंतिम मुदत १५ जुलै आहे.त्यामुळे निवडणूक  प्रक्रिया राबविण्यास अवधी आहे.
- राजेश पांडे ,सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: once again election in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.