सध्याच्या संगीतात '' गोडवा '' नाही : अमिन सायानी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 04:34 PM2019-05-25T16:34:55+5:302019-05-25T16:44:18+5:30

मध्यंतरीच्या काळात रेडिओवर संगीत बंद केले नसते तर चित्र कदाचित बदलले नसते.

No "sweetness" in present-day music: Amin sayani | सध्याच्या संगीतात '' गोडवा '' नाही : अमिन सायानी

सध्याच्या संगीतात '' गोडवा '' नाही : अमिन सायानी

googlenewsNext

पुणे : रेडिओ हे संवादाचे माध्यम आहे. जणू आपला मित्र आपल्याशीच बोलत आहे की काय असे श्रोत्यांना वाटायला हवे. गीतांमधून श्रोत्यांची कल्पनाशक्ती जागृत व्हायला हवी.संगीतकार नौशाद म्हणायचे, अपना संगीत दिल को छूता था, लेकिन आजका संगीत तनको छूता है.... सध्याच्या संगीतात गोडवा राहिला नसल्याची खंत '' बिनाका गीतमाला '' चे ज्येष्ठ निवेदक अमिन सायानी यांनी व्यक्त केली. 
   जी हां बहनो और भाईयो....हा आवाज ऐकला की डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे अमिन सायानी. बिनाका गीतमाला च्या माध्यमातून हे नाव घराघरात पोहोचले. शनिवारी (25 मे) संवाद पुणे आणि आरती दीक्षित प्रस्तुत सफर गीतमाला का हा 25 वर्षांचा सरताज गीतांचा सुरीला अविष्कार सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी अमिन सायानी पुण्यात आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. 
    त्याकाळात ऑल इंडिया रेडिओवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने हिंदी गीतांचे सादरीकरण करण्यास केलेला मज्जाव...पंडित नेहरूंमुळे  रेडिओवर पुन्हा हिंदी गीते प्रसारित करण्याची मिळालेली संधी..बिनाका गीतमाला चा सुरू झालेला प्रवास...श्रोत्यांना यामाध्यमातून घडलेली संगीताची सफर असा आठवणींचा एकेक गुलदस्ता त्यांनी उलगडला.हिंदी चित्रपट संगीताने कशाप्रकारे श्रीमंत केले? चित्रपट संगीत नसते तर काय झाले असते?  याविषयी विचारले असता ते म्हणाले, बहुभाषिक धर्मीयांना एकत्रित आणणे, एकात्मकतेच्या बंधनात बांधणे हा चित्रपट संगीताचा गुण आहे. आपण एक आहोत हा विचार संगीताने सर्वांना दिला. भारतीय संगीताने एकात्मकतेचा संदेश दिला. सर्व धर्मीय लोकांमध्ये एकमेकांमध्ये भाईचारा होता. मध्यंतरीच्या काळात रेडिओवर संगीत बंद केले नसते तर चित्र कदाचित बदलले नसते. आजकाल भ्रष्टाचार, बलात्कार सारख्या घटना पाहिल्या की मन सुन्न होते. आपण हिंदी चित्रपट गीतांना अधिकाधिक बढावा द्यायला हवा होता. 
 रेडिओ माध्यमात कालपरत्वे अनेक बदल झाले आहेत. ते चांगले की वाईट हे सांगू शकत नाही. मात्र आजकाल रेडिओवर संवाद कमी आणि आरडाओरडाच अधिक ऐकायला मिळत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
-----------------------------------------------------------
.................
'' त्या '' पत्राने ओशाळलो
ऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम करत असल्याने अनेक पत्र यायची.अनेक मुली लग्नासाठी विचारणा करायच्या. एकदा एका महिलेकडून शाल भेट म्हणून पाठविण्यात आली. माझं लग्न झालं आहे, असे पत्र मी तिला पाठविले. त्यावर मी तुझ्या आईसमान आहे असे त्यांचे पत्र आले आणि मी अगदी ओशाळलो. त्यादिवसानंतर कुणालाही पत्र पाठविण्याच्या भानगडीत पडलो नसल्याची मिश्किल टिप्पणी अमिन सायानी यांनी केली.

Web Title: No "sweetness" in present-day music: Amin sayani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.