पुणे : दहा बाय वीसच्या खोलीत राहूनही मातीत जीव ओतून कला फुलवायची... दिवसा देवीची मूर्ती साकारायची आणि रात्री सुरक्षारक्षकाची नोकरी करीत रात्र जागवायची... सकाळी थोडी विश्रांती घेऊन पुन्हा मूर्तिकामाला सुरुवात करायची.
सुनील सोनटक्के हे मूर्तिकार गेली अनेक वर्षे अशा दिनक्रमात मूर्ती साकारण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. ‘माझे नवरात्र, माझी मूर्ती’ या धारणेने ते स्वत: देवीची मूर्ती तयार करून स्वत:च्या घरी घटस्थापना करतात. परंतु, या कलेला व्यावसायिक रूप देणे त्यांना मान्य नाही. शिल्पकलेला व्यावसायिक रूप देणे सुनील सोनटक्के यांना मान्य नाही. ते म्हणाले, ‘‘जी आई आहे, तिला विकू कसा? गणेश विसर्जनाच्या दुसºयाच दिवसापासून मी शाडूची मूर्ती साकारायला सुरुवात करतो. मला याकामी पत्नी मदत करते. ‘‘मूर्ती रंगवण्यासाठी मी नैैसर्गिक रंगच वापरतो. नवरात्रामध्ये भक्तिभावाने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो आणि कोजागरीला मूर्ती विसर्जित करतो. या वर्षी मी कोल्हापूरच्या आंबाबाई देवीची मूर्ती तयार केली आहे.’’

सोनटक्के आठ वर्षांपासून खासगी रुग्णालयामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहेत. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले सोनटक्के यांना शिल्पकला अवगत आहे. लहानपणापासून ते आईच्या सुबक रांगोळीचे निरीक्षण करायचे. एकदा आई टायफॉईडने आजारी पडली आणि लहानशा सुनीलने रांगोळी हातात धरली. दुसरीकडे, वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून त्यांना मातीत खेळण्याची आवड निर्माण झाली.

सुरुवातीला त्यांनी लहानशी शंकराची पिंड, मग गणपती साकारले. त्यांनी एकदा तुळजाभवानीची छोटीशी मूर्ती साकारली. आईने ती मूर्ती देवघरात ठेवली. कालांतराने सोनटक्के यांच्यातील कला टप्प्याटप्प्याने बहरत गेली. आता ते देवीच्या उत्तम दर्जाच्या शाडूमातीच्या मूर्ती साकारतात. ‘माझे नवरात्र, माझी मूर्ती’ या धारणेने ते गेल्या ३२ वर्षांपासून देवीची मूर्ती साकारतात आणि घटस्थापना करतात. आजवर त्यांनी महाकाली, नंदिनी, गायत्री, अन्नपूर्णा, महालक्ष्मी, दुर्गा, कालिकामाता अशी देवीची अनेक रूपे साकारली आहेत. या वर्षी सोनटक्के कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती साकारत आहेत.
- सुनील सोनटक्के