पुढचा अतिरेकी हल्लाही समुद्रमार्गेच होण्याचा धोका - दत्तात्रय शेकटकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 03:17 AM2018-12-20T03:17:08+5:302018-12-20T03:17:31+5:30

दत्तात्रय शेकटकर : अतिरेकी संहारक अस्त्रे वापरू शकतात

The next terrorist attack will be threatened by seaside - Dattatray Shekatkar | पुढचा अतिरेकी हल्लाही समुद्रमार्गेच होण्याचा धोका - दत्तात्रय शेकटकर

पुढचा अतिरेकी हल्लाही समुद्रमार्गेच होण्याचा धोका - दत्तात्रय शेकटकर

googlenewsNext

मुंबई : मुंबईवर २६/११चा हल्ला समुद्रमार्गे झाला, तशाच प्रकारच्या हल्ल्याचा धोका भविष्यातही आहे. मात्र, पुढच्या वेळी अतिरेकी किनारपट्टीवर न उतरता दूर समुद्रातूनच क्षेपणास्त्रासारखी अधिक संहारक अस्त्रे वापरून हल्ला करू शकतात; आणि हा हल्ला २६/११ पेक्षाही अधिक संहारक असू शकेल, अशी भीती केंद्राच्या लष्करी आधुनिकीकरण समितीचे प्रमुख, निवृत्त लेफ्ट. जनरल डी. बी. शेकटकर यांनी व्यक्त केली.

माजी केंद्रीय अप्पर गृहसचिव आर. व्ही. एस. मणी यांनी लिहिलेल्या आणि अरुण करमरकर यांनी अनुवादित केलेल्या ‘हिंदू दहशतवाद एक थोतांड’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले. २६/११ च्या हल्ल्याला १० वर्षे झाल्यानिमित्त या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेल्या मुंबईतील ताजमहाल या हॉटेलातच हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात स्थानिकांचाही सहभाग असल्याची कबुली अजमल कसाब याने चौकशीदरम्यान दिली होती. त्याच्या या जबाबाची माहिती तपास यंत्रणांनी तत्कालीन सरकारलाही दिली. मात्र, पुढे जाणीवपूर्वक हा विषय बाजूला सारण्यात आला. हिंदू दहशतवाद म्हणून जे थोतांड उभारण्यात आले, त्याचा सर्वाधिक फटका मराठी तरुणांना बसला. महाराष्ट्राला हिंदू दहशतवादाची प्रयोगशाळा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असे मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक मणी यांनी या वेळी सांगितले.

दहशतवादाला कोणताही धर्म, रंग नसतो. मात्र, त्याला धार्मिक रंग दिल्यामुळे देशाच्या भावी पिढ्यांची अपरिमित हानी होत आहे. भारतीयांची एकंदर लोकसंख्या पाहता, सध्या जगातील प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय किंवा भारतीय वंशाची आहे, अशा वेळी दहशतवादाला धार्मिक लेबले लावल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलू शकतो, असे मत शेकटकर यांनी वेळी व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर आर. व्ही. एस. मणी, अरुण करमरकर, पत्रकार मकरंद मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: The next terrorist attack will be threatened by seaside - Dattatray Shekatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.