पुढचा गळीत हंगाम अडचणीचा, आगामी गळीत कार्यक्रमाची आखणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:09 AM2017-12-27T05:09:53+5:302017-12-27T05:10:05+5:30

पुणे : राज्यासह देशात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने, पुढील वर्षी विक्रमी ऊस उत्पादन होऊन गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Next Crash Season Difficulty | पुढचा गळीत हंगाम अडचणीचा, आगामी गळीत कार्यक्रमाची आखणी करा

पुढचा गळीत हंगाम अडचणीचा, आगामी गळीत कार्यक्रमाची आखणी करा

Next

पुणे : राज्यासह देशात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने, पुढील वर्षी विक्रमी ऊस उत्पादन होऊन गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक असून, पुढील गळीत कार्यक्रमाची आखणी करावी, अशी सूचना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ४१व्या विशेष सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कलाप्पा आवाडे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नागवडे या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशात सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले असल्याने, काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका पुढील गळीत हंगामाला होईल. त्यामुळे आत्तापासूनच पुढच्या गळीत हंगामाची तयारी करावी. कदाचित पुढील हंगामात कारखाने लवकर सुरू करावे लागतील. तसे न केल्यास कारखाने जूनपर्यंत चालू ठेवावे लागतील. परिणामी, साखरेच्या उताºयात घट होईल. त्यामुळे ऊस उत्पादकांना उसाची योग्य किंमत देताना कारखान्यांना कसरत करावी लागेल.
उसाचे उत्पादन वाढल्यास इथेनॉल करण्याची शिफारस अनेकांनी केली आहे. ब्राझिलसारख्या देशात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केला जातो. ती पद्धत भारतासाठी सध्या अनुकुल नाही. ही पद्धत अधिक खर्चिक असल्याचे प्रयोगावरुन लक्षात आले आहे. त्यामुळे कारखान्यांनी मोलॅसिस साठवून, पुढे त्याचा वापर इथेनॉलसाठी करावा. त्याचबरोबर खर्चात काटकसर करावी, साखरेच्या उत्पादनखर्चात कपात कशी होईल याचे नियोजन केले पाहिजे, असे पवार या वेळी म्हणाले.
साखर कारखानदारी अडचणीत असताना या पूर्वी राज्यासह केंद्र सरकारने देखील मदतीची भूमिका घेतली आहे. सध्याच्या सरकारची तशी भूमिका असल्याचे वाटत नाही. साखर कारखानदारी हा व्यवसाय असून, त्यातील तोटा आणि नफा हा त्या उद्योगांनी पाहावा, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊनच अपल्याला उद्योगाचे नियोजन करावे लागेल. पुढील हंगामात ज्या ठिकाणी ऊस तुलनेने कमी असेल, त्यांनी जास्तीचा ऊस असणाºया भागातील उत्पादकांशी करार करावेत, असा सल्लाही पवार यांनी दिला.
>ऊस आणि साखर उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि विविध साखर कारखान्यांना वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता.२६) संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वाेत्कृष्ट कै. वसंतदादा पाटील सोनहिरा (वांगी, ता.कडेगाव, जि. सांगली) या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

Web Title: Next Crash Season Difficulty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.