naxals played a role in fanning dalit agitation says security reports | भीमा कोरेगाव घटना : नक्षलवाद्यांनी रचला होता हिंसाचाराचा कट?
भीमा कोरेगाव घटना : नक्षलवाद्यांनी रचला होता हिंसाचाराचा कट?

पुणे - पुण्यातील भीमा-कोरेगावातील दलित संघटनांच्या आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांनी भीमा-कोरेगावमध्ये सेमिनारचं आयोजन केले होते, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाद निर्माण करुन व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित संघटनांच्या आंदोलनाचं लोण पसरावं, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे म्हटलं जात आहे. भीमा कोरेगावातील हिंसाचार घडण्याच्या बरोबर एक दिवसापूर्वी मुंबईमध्ये नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशनची बैठक 'एल्गार परिषद'चे सीलबंद करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी हा निष्कर्ष काढला आहे. 

'टाईम ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार,  एका पोलीस अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवरुन माहिती दिली की, 'सुरक्षा यंत्रणांच्या रिपोर्ट्सनुसार 31 डिसेंबर 2017 च्या दिवशी पुण्यातील शनिवार वाडामधील आयोजित एल्गार परिषदेत सहभागी झालेल्या लोकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, 'त्यामुळे अशा आंदोलनात एकतर नक्षलवादी  घुसतात तरी किंवा अशा प्रकारे  हिंसाचारही घडवतात. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत'.  

दरम्यान, हिंसक आंदोलनामध्ये डाव्या संघटनांचा हात असू शकतो, हे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारले आहे. मात्र दुसरीकडे या संघटनांच्या भूमिकेबाबत चौकशी करत असल्याची माहितीही त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'सोबत संवाद साधताना दिली. 

भीमा कोरेगाव घटना : महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी (1 जानेवारी) झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी (3 जानेवारी) महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी व बसचे चालक गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे शीघ्रकृती दलाच्या जवानांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

आंबेडकरी कार्यकर्ते सकाळपासूनच मोठ्या संख्यने रस्त्यांवर उतरल्याने सगळीकडे चक्का जाम झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह सर्व मार्गावरील ठिय्या आंदोलने आणि ठिकठिकाणी रेलरोकोमुळे मुंबईची चहूबाजुंनी कोंडी झाली. चेंबूर नाका येथे स्कूलबसवर झालेल्या दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. कोल्हापुरात भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला.

जमावाने शेकडो वाहनांची जाळपोळ केली. बीड आणि चंद्रपूरमध्ये भाजपा आमदारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तर पुण्यात हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्या घरावर जमाव चालून गेला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित घटना टळली. राज्यभर संतप्त पडसाद उमटत असतानाही पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत आंदोलन चिघळू दिले नाही. सायंकाळी ४ वाजता अ‍ॅड. आंबेडकर यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, तोपर्यंत राज्यभर असंतोषाचा भडका उडालेला होता.

कोणाचीही गय नाही
कोरेगाव-भीमा येथे जी काही घटना घडली आहे, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अटक होईल ही अपेक्षा
कोरेगाव भीमामधील हिंसेला जबाबदार असलेले शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा बाळगून आम्ही हा बंद मागे घेत आहोत. बंदसाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी जनतेचे अभिनंदन करतो, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.


Web Title: naxals played a role in fanning dalit agitation says security reports
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.