मायलेकीच्या ‘पुणे-कन्याकुमारी’ प्रवासाने रचला इतिहास; ‘बेटी बचाव’च्या संदेशातून ‘मन की बात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 02:06 PM2017-11-03T14:06:28+5:302017-11-03T15:25:08+5:30

पुणे ते कन्याकुमारी असा ३ हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास मायलेकींनी अवघ्या आठ दिवसात दुचाकीवरून पूर्ण  करीत एक नवा इतिहास घडविला.

mother-daughter created history by travel 'Pune-Kanyakumari' | मायलेकीच्या ‘पुणे-कन्याकुमारी’ प्रवासाने रचला इतिहास; ‘बेटी बचाव’च्या संदेशातून ‘मन की बात’

मायलेकीच्या ‘पुणे-कन्याकुमारी’ प्रवासाने रचला इतिहास; ‘बेटी बचाव’च्या संदेशातून ‘मन की बात’

Next
ठळक मुद्देपुणे ते कन्याकुमारी दुचाकी प्रवासात मन्वाने पुरेपूर साथ दिली : मनाली भिडेआई माझी प्रेरणा आहे. पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास मी तिच्यासमवेत एन्जॉय केला : मन्वा भिडे

नम्रता फडणीस

पुणे :  ‘सायकल’ ही तिची खरी पॅशन. सायकल घ्यायची आणि अगदी कुठेही मनसोक्त भटकंती करायची हा तिचा एकमेव ध्यास. परंतु यावेळेला तिने आपल्या आवडीला जरा एक वेगळेच वळण दिले...लांब पल्ल्याचा प्रवास तोही स्वत: च्या मुलीबरोबर एकटीने करण्याचे धाडस आजवर एकाही महिलेने केले नव्हते. तिने मात्र हे शिवधनुष्य लीलया पेलत आपल्या कृतीतून ते सिद्ध केले..पुणे ते कन्याकुमारी असा ३ हजार ३४४ किलोमीटरचा प्रवास मायलेकींनी अवघ्या आठ दिवसात दुचाकीवरून पूर्ण  करीत एक नवा इतिहास घडविला. या प्रवासादरम्यान ‘बेटी वाचवा’ च्या संदेशातून ‘मन की बात’ तिने ग्रामस्थांना सांगितली हे त्यातील विशेष!  
सुरूवातीला कुटुंबातील प्रत्येक जण तिला एकटीला प्रवासाला पाठवायला नकार देत होता.कुणाबरोबर जायचे तरी कुणी तिच्याबरोबर येण्यास तयार होत नव्हता. मग तिनेच आपल्या सातवी इयत्तेत शिकणा-या मुलीला हळूच खडा टाकत तू येशील का माझ्याबरोबर? अशी विचारणा केली आणि तिने तत्काळ होकार देताच तिच्या डोळ्यात पाणी तरळले..त्या  ‘हो’ शब्दानेच प्रवासाची एक सकारात्मक उर्जा तिला मिळाली. ही कहाणी आहे मनाली भिडे आणि मन्वा भिडे या मायलेकीची. सगळे बायकर्स महागड्या बाईकने कन्याकुमारीला जातात पण दोघींनी अँक्टिव्हावर हा प्रवास पूर्णत्वास नेला. या प्रवासाचा संपूर्ण अनुभव मनाली भिडे हिने  ‘लोकमत’शी बोलताना कथन केला. 
मनाली म्हणाली, खर तर मला पुणे ते  कन्याकुमारी सायकल वरून करायचे होते मी गेले कित्येक वर्ष वाट बघत होते पण ग्रुप तयार होत नव्हता, त्यामुळे मी गाडीवरून जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रवासात मन्वाने पुरेपूर साथ दिली. प्रवासामध्ये झाशीच्या राणीसारखे मी तिला ओढणीने घट्ट बांधून घेतले होते. रोज १२ तास ती गाडी वर बसून होती. पण तिने कधीही  कंटाळा केला नाही रोज नव्या उत्साहाने ती तयार होत होती. अवघ्या १२ वर्षाच्या माझ्या चिमुरडीचा हा उत्साह बघून मला पण रोज एनर्जी मिळत होती. या प्रवासाने आई मुलीचे नाते अजून घट्ट झाले. मन्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, आज मी जी काही आहे, ते तिच्या पाठिंब्यामुळेच. माझी आई आणि दोन बहिणी यांचापण मोलाचा वाटा आहे. प्रवासात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यातून फिरलो. निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवत होतो. जमेल तेवढे डोळ्यात आणि कॅमेरामध्ये साठवून घेत होतो. भाषेचा प्रचंड अडथळा येत होता. तरीही संवाद साधत होतो. प्रवासादरम्यान एकदाही मनाला भीती किंवा शंकेचा विचारही शिवला नाही किंवा असुरक्षित वाटले नाही. पण रात्रीचा प्रवास कटाक्षाने टाळला.  मी पूर्णपणे सकारात्मक राहिले, आपला प्रवास चांगलाच होणार आणि आपल्याला चांगलीच लोक भेटणार असे मनाशी पक्के ठरवले होते आणि झाले देखील तसेच, आणि मुख्य म्हणजे माझी मुलगी  माझ्या बरोबर होती. हे जग खूप सुंदर आहे, ते अनुभवायला हवे. बाई असली म्हणून काय झाले? मी विश्वासावर जगते, माणुसकी अनुभवते, प्रवासात विविध भागातील लोकांचे स्वभाव, संस्कृती जाणून घेते, याचाही मला प्रचंड आनंद मिळतो, असे तिने सांगितले.

 


‘हे सुंदर जग अनुभवण्यासाठी मुलींनी घराबाहेर पडावे, अगदी निर्धास्तपणे. मुलींना जगवा आणि मुलींना शिकवा हा संदेश दिला. मजा आली.. एक थरारक राईडचा अनुभव घेता आला.
- मनाली भिडे

 


माझी आई माझ्याबरोबर होती, मग मला अजून काय हवे होते. आई माझी प्रेरणा आहे. आजवर मी तिच्याबरोबर सायकलीचा थोडाफार प्रवास केला आहे. पुणे ते कन्याकुमारी हा प्रवासही मी तिच्यासमवेत न कंटाळता खूप एन्जॉय केला.
- मन्वा भिडे (मुलगी)

Web Title: mother-daughter created history by travel 'Pune-Kanyakumari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे