पुण्यातील ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवर सर्वाधिक ‘हॉकर्स’, अंमलबजावणी झाल्यास पुणेकरांना किमान फुटपाथवर चालता येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 02:23 AM2018-11-08T02:23:15+5:302018-11-08T02:23:32+5:30

सन २००८ मध्ये महापालिकेच्या वतीने शहरातील ४५ प्रमुख रस्ते व तब्बल १५० चौक ‘नो हॉकर्स’ झोन जाहीर केले; परंतु सध्या शहरात ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवरच सर्वाधिक हॉकर्स असल्याचे चित्र आहे.

Most 'Hawkers' on the streets of 'No Hawkers' in Pune | पुण्यातील ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवर सर्वाधिक ‘हॉकर्स’, अंमलबजावणी झाल्यास पुणेकरांना किमान फुटपाथवर चालता येईल

पुण्यातील ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवर सर्वाधिक ‘हॉकर्स’, अंमलबजावणी झाल्यास पुणेकरांना किमान फुटपाथवर चालता येईल

Next

पुणे - शहरातील प्रामुख्याने बाजारपेठा, गर्दी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, नागरिकांना फुटपाथवरून किमान चालता यावे यासाठी सन २००८ मध्ये महापालिकेच्या वतीने शहरातील ४५ प्रमुख रस्ते व तब्बल १५० चौक ‘नो हॉकर्स’ झोन जाहीर केले; परंतु सध्या शहरात ‘नो हॉकर्स’ रस्त्यांवरच सर्वाधिक हॉकर्स असल्याचे चित्र असून, सणासुदीच्या काळात फुटपाथ, रस्त्यांवरील हॉकर्सची संख्या प्रचंड वाढते. यामुळे सध्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या भागात खरेदीसाठी नागरिकांना वाहतूककोंडीचा व फुटपाथवर चालण्यासाठी देखील जाग नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे शहरात फेरीवाला धोरण तयार करण्यात आले. वाढत असलेली वाहनसंख्या व गर्दी लक्षात घेऊन रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी अत्यंत कडक नियमावली तयार करण्यात आली. यासाठी शहरातील प्रमुख ४५ रस्ते व सुमारे १५० प्रमुख चौक ‘नो हॉकर्स’ म्हणून जाहीर करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य सभेची मान्यता घेऊन शहरातील या नो हॉकर्स रस्त्यांवर व चौकांमध्ये पथारीवाले, फेरीवाले आदींना व्यवसाय करता येणार नाही, असेदेखील निश्चित करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने या नो हॉकर्स झोनमध्ये फुटपाथ, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात वारंवार कारवाई करण्यात येते. परंतु सध्या तरी शहरातील नो हॉकर्स झोन कागदावर राहिले असल्याचे स्पष्ट ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या पाहणीमध्ये निदर्शनास आले.
सध्या दिवाळीनिमित्त प्रमुख्याने शहराच्या मध्यवस्ती भागातील बाजारपेठाच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली असली, तरी लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रोड, फर्ग्युसन रस्ता या सर्व प्रमुख नो हॉकर्स
रस्त्यांवर, फुटपाथवर मोठ्या प्रमाणात हॉकर्सने अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. यामुळे नागरिकांच्या
गर्दीबरोबरच हॉकर्सच्या अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडली आहे.

हे आहेत शहरातील नो हॉकर्स झोन

बाजीराव रस्ता (नवा पूल ते सारसबाग-मित्रमंडळ चौकापर्यंत), लक्ष्मी रस्ता (नाना पेठ ते टिळक चौक), फर्ग्युसन रस्ता (गरवारे पूल ते न. ता. वाडी), सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता (टिळक चौक ते टिळक पुतळा), शनिवार पेठ, केळकर रस्ता (टिळक चौक ते अप्पा बळवंत चौक आणि शिवाजी रस्त्यापर्यंत), टिळक रस्ता (धोबी घाट ते टिळक चौक), जंगलीमहाराज रस्ता, शास्त्री रस्ता (इंजिनिअरिंग कॉलेज चौक ते दांडेकर पूल), शंकरशेठ रस्ता, कर्वे रस्ता, पौड फाटा (डेक्कन जिमखाना ते चांदणी चौक), कर्वेनगर रस्ता (कोथरूड बसस्टँड ते पुणे-मुंबई बायपासपर्यंत), नवी पेठ, सेनापती बापट रस्ता (शास्त्री रस्ता जंक्शन, म्हात्रे पूल, लॉ कॉलेज रोडपासून गणेशखिंड रस्त्यापर्यंत), पुणे स्टेशन रस्ता (शनिवारवाडा, लालमहाल,फडके हौद, नरपतगीर चौक, ससूनमार्गे स्टेशनपर्यंत), आंबेडकर रस्ता (बंडगार्डन पोलीस स्टेशन ते मनपा हद्दीपर्यंत), विधानभवन मार्ग (दोराबजी, आयनॉक्स, वाडिया कॉलेज चौक), पं. नेहरू रस्ता, मार्केट यार्ड (मंगळवार पेठ, मालधक्का चौक, नेहरू रस्ता, अप्सरा टॉकीज, मार्केटयार्ड बसस्टँड, बिबवेवाडी-कोंढवा जंक्शन), सिंहगड रोड (सारसाबाग, पर्वती ओव्हर ब्रिजखालून ते राजाराम पुलापर्यंत), स्पायसर कॉलेज रस्ता (बोपोडी रेल्वे गेट नं. २० ते ब्रेमेन चौक), प्रभात रस्ता (कर्वे रोड जंक्शन ते लॉ कॉलेज रोड), कोंढवा-एनआयबीएम रस्ता पूर्ण, कसबा पेठ, मंगळवार पेठ (शिवाजी रस्ता जंक्शन, सूर्या हॉस्पिटल, कमला नेहरू हॉस्पिटल, अपोलो टॉकीज, सोमवार पेठ ते आंबेडकर रस्ता), विमानतळ ते राजभवन रस्ता, शिवाजी रस्ता, पुणे सातारा रस्ता (कात्रज जकातनाक्यापर्यंत), बिबवेवाडी रस्ता (सातारा रोड जंक्शन ते अप्पर इंदिरानगर बसस्टँडपर्यंत), डेक्कन कॉलेज रस्ता (येरवडा ते विश्रांतवाडी पेट्रोलपंपापर्यंत), नगर रस्ता, सोलापूर रस्ता (येरवडा, गुंजन टॉकीज, रामवाडी ते मुंढवा पूल, सोलापूर रस्त्यापर्यंत), पाषाण गाव-सूस रोड, शिवरकर रस्ता (सोलापूर रस्ता जंक्शन ते केदारी मळ्यापर्यंत), शिवाजीनगर, भांडारकर रस्ता (डेक्कन जिमखाना ते लॉ कॉलेज रोड), सहकारनगर, गोळवलकरगुरुजी रस्ता (पुणे सातारा रस्ता जंक्शन, वाळवेकरनगर, तळजाई, लक्ष्मीनगर ते पर्वती पायथा), महाराणा प्रताप रस्ता (घोरपडे पोलीस चौकी ते नेहरू हॉस्पिटल), कोरेगाव पार्क, मुंढवा (कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड, साऊथ मेन रोड, बी. टी. कवडे रोड), राजाराम पूल ते धायरी जकात नाका, शिवाजीनगर कोर्ट परिसर (कोर्टाच्या उत्तर व दक्षिणेकडील रस्ते), शिवाजीनगर (पालिका मुख्य इमारतीजवळील परिसर, डेंगळे पूल ते झाशीची राणी चौक), जेधे चौक ते सारसबाग, कसबा पेठ (गाडगीळ पुतळा चौक ते शिवाजी स्टेडियम ते आरटीओ), औंध (परिहार चौक ते बाणेर फाटा), येरवडा (पर्णकुटी, आळंदी रोड, फुलेनगर, आरटीओ ते कळसपर्र्यंत), चंदननगर (चंदननगर, मुंढवा, मगरपट्टा ते हडपसर), गुळवणी महाराज पथ (सुधीर फडके भुयारी मार्ग ते जी. ए. कुलकर्णी प, साकेत सोसायटी), गोखले रोड (दीपबंगला चौक परिसर), हडपसर भैरोबानाला ते आकाशवाणी केंद्र, मनपा हद्दीपर्यंत, सोलापूर रोड ते सासवड रोड मनपा हद्दीपर्यंत, हडपसर मार्केटच्या सभोवतालचे सर्व रस्ते), गजानन महाराज मठ परिसर (गोळवलकर गुरुजी पथ, गजानन महाराज मठ ते यशवंतराव चव्हाणनगर कमानीपर्यंत), राजाराम पूल ते नांदेड फाटा, सणस हायस्कूल ते धायरी गाव शेवटच्या बसस्टॉपपर्यंत, येरवडा (गोल्फ चौक ते शास्त्रीनगर चौकापर्यंत, डॉन बॉस्को रोड) ,शिवाजीनगर (संचेती हॉस्पिटल चौक ते पुणे-मुंबई रस्त्यावर पालिका हद्दीपर्यंत)

या ठिकाणी केली पाहणी

लक्ष्मी रस्ता : लक्ष्मी रस्त्यावर बहुतेक सर्व दुकानांच्या बाहेर फुटपाथवरच अनेक हॉकर्सने छोटे-छोटे स्टॉल लावले आहेत. चप्पल विक्रीपासून, कपडे, खाद्यपदार्थ, पुस्तकांचे स्टॉल लावून विक्री केली जाते. यामध्ये अनेक ठिकाणी फुटपाथच्या बाहेर वाहन पार्किंगच्या जागेतदेखील अनेक हॉकर्सने आपले स्टॉल लावून पार्किंगच्या जागा अडवल्या आहेत.
बाजीराव रस्ता : बाजीराव रस्त्यावर देखील प्रामुख्याने शनिपार परिसर, तुळशीबागेच्या बाहेर, जिलब्या मारुती परिसर आदी भागात देखील फळ, भाजीविक्रेत्यांपासून, दिवाळीचे साहित्य विक्री करणारे अनेक हॉकर्स थेट रस्त्यावर व फुटपाथवर विक्री करताना दिसत होते.
फर्ग्युसन रस्ता : फर्ग्युसन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्वस्त दरात कपडे, पर्स, सौंदर्यप्रसादने विक्री करणाºया हॉकर्सने आपले स्टॉल थाटले आहेत. यामुळे सध्या या रस्त्यावर दुकानांपेक्षा फुटपाथवरच हॉकर्स आणि तरुण-तरुणी ग्राहकांची गर्दी अधिक असते.

शहरात ४१९ हॉकर्स झोन
महापालिकेच्या वतीने शहरातील ‘नो हॉकर्स’ झोनमधील रस्ता, फुटपाथवरील हॉकर्सचे पुनर्वसन करण्यासाठी तब्बल ४१९ ठिकाणी हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. शहरातील १२ हजार अधिकृत हॉकर्सपैकी आतापर्यंत ७ हजार हॉकर्सचे या निश्चित केलेल्या हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन देखील करण्यात आले आहे, तर शिल्लक ६ हजार हॉकर्सचे येत्या महिना अखेरपर्यंत पुनर्वसन पूर्ण करण्यात येईल; परंतु हॉकर्सचे पुनर्वसन केल्यानंतर, पुन्हा त्या जागांवर अतिक्रमण होते. यामुळे सध्य काही अडचणी येत असून, शंभर टक्के नोंदणीकृत हॉकर्सचे पुनर्वसन झाल्यानंतर, अनधिकृत हॉकर्सवर कडक कारवाई करण्यात येईल.
- माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख, महापालिका
 

Web Title: Most 'Hawkers' on the streets of 'No Hawkers' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.