चार लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 01:44 AM2019-01-21T01:44:52+5:302019-01-21T01:45:11+5:30

सध्या शहरामध्ये पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या भांडणात पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले असतानाच शहरामध्ये तीनपट म्हणजे तब्बल ४ लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

More than four lakh unauthorized tap connections | चार लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन

चार लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन

Next

- सुषमा नेहरकर-शिंदे 
पुणे : सध्या शहरामध्ये पाटबंधारे विभाग आणि महापालिकेच्या भांडणात पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले असतानाच शहरामध्ये तीनपट म्हणजे तब्बल ४ लाखांहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील बहुचर्चीत २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजने अतंर्गत एल अ‍ॅन्ड टी कंपनीच्या वतीने व्यावसायिक, औद्यागिक वापराच्या आणि घरगुती नळ कनेक्शनची तपासणी केली. यामध्ये ही वस्तुस्थिती समोर आली असून, एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून सर्व्हेचा डेटा नुकताच पाणी पुरवठा विभागाकडे दिला आहे.
शहरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठ्याच्या पुरता बोजवारा उडाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा शिल्लक असताना दोन विभागाच्या भांडणामध्ये पुणेकरांना हक्काच्या पाणी पुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. सध्या महापालिका दररोज १३५० एमएलडी पाणी धरणातून उचलत असताना अनेक भागामध्ये पुरेसा पाणी साठ मिळत नाहीत. शहरात फोफावलेल्या अनधिकृत नळ कनेक्शनमुळे अनेक भागात पाण्याचा दाब एवढा कमी असतो की पहिल्या मजल्यावर देखील पाणी पोहचत नसल्याची वस्तुस्थिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची ही चोरी सुरू असून, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून शहरातील प्रामुख्याने शंभर टक्के व्यावसायिक नळ कनेक्शनची तपासणी केली. यात सर्व हॉस्पिटल, लॅब, क्लिनिक, शाळा, महाविद्यालय, हॉटेल, रेस्टॉरन्ट, हॉस्टेल्स आदी सर्व ठिकाणची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे समोर आले. याशिवाय काही भागात घरगुती वापराचेदेखील नळ कनेक्शनची तपासणी करण्यात आली आहे.
>पाणीपट्टी : थकबाकी ५०० कोटींच्या घरात
शहरामध्ये अधिकृत नळ कनेक्शनची संख्या १ लाख ६० हजारच असली तरी पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ५०० कोटींच्या घरात गेली आहे. थकबाकी दारांमध्ये देखील व्यावसायिक व औद्योगिक ग्राहक जास्त असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील सर्व अधिकृत ४० हजार व्यावसायिक प्रॉपर्टींना मिटर बसविण्यात आले असल्याचे पाणी पुरवठा विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.
.अनधिकृत नळ कनेक्शनची माहिती लवकरच जाहीर करणार
शहरामध्ये सध्या २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून, शंभर टक्के प्रॉपर्टींना पाणी मिटर बसविण्यात येणार आहे. यासाठी योजनेचे काम देण्यात आलेल्या एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून शहरातील सर्व प्रॉपर्टीचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये प्राथमिक अहवालामध्ये तब्बल तीनपट अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे निदर्शनास आले आहे. कंपनीकडून सर्व्हे संदर्भातील सर्व डेटा पाणी पुरवठा विभागाकडे दिला असून, येत्या महिन्यात सर्व डेटाचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरामध्ये अनधिकृत नळ कनेक्शनची माहिती जाहीर करण्यात येणार आहे.
-व्ही. जी. कुलकर्णी,
मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग
शहरामध्ये तब्बल आठ लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक आहेत. अधिकृत नळ कनेक्शनची संख्या केवळ १ लाख ६० हजार एवढीच आहे. यामध्ये केवळ ४० हजार नळ कनेक्शन व्यावसायिक व औद्यागिक स्वरूपाची आहेत.

Web Title: More than four lakh unauthorized tap connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी