Mobile stealer arrested from Panvel on advertising website | ओएलएक्स वेबसाईटवरील जाहिरातीवरुन मोबाईल चोरी करणाऱ्याला पनवेलहून अटक
ओएलएक्स वेबसाईटवरील जाहिरातीवरुन मोबाईल चोरी करणाऱ्याला पनवेलहून अटक

ठळक मुद्देविशाल शर्मा याला अटक करुन त्यांच्याकडील वापरलेले ४ मोबाईल, एक बँकेचे डेबिट कार्ड हस्तगतविशाल शर्माविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात २०१३ मध्ये झाली होती अटक

पुणे : ओएलएक्स आॅनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर मोबाईल विक्रीसाठी दिलेल्या जाहीरातीला प्रतिसाद देताना नाव बदलून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करुन तो चोरुन नेणाऱ्याला सायबर सेलने पनवेल येथून अटक केली.
विशाल हरिष शर्मा (वय ३३, रा़ साईराज अपार्टमेंट, दुबेपार्क समोर, करंजाळे, पनवेल) असे त्याचे खरे नाव आहे.
याबाबत सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर भागात राहणाऱ्या महिलेने आपला सॅमसंग नोट ४ कंपनीचा मोबाईल विक्रीसाठी ओएलएक्स या वेबसाईटवर जाहिरात दिली होती़ विशाल शर्मा याने मोबाईल खरेदी करण्याची तयारी दर्शविली़ परंतु, आपले नाव त्याने आदित्य मल्होत्रा असे सांगितले होते़ त्यांना जंगली महाराज रोडवरील मॉडर्न कॅफेमध्ये बोलावून घेतले़ बोलत असताना त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा मोबाईल घेऊन आपल्या मोबाईलला रेंज नसल्याचा बहाणा करुन व महत्वाचा फोन करायचा आहे, सांगून त्यांचा मोबाईल फोन घेऊन बाहेर गेला व तेथून तो पळून गेला़ त्या फोनच्या कव्हरमध्ये त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स व बँकेचे डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड होते़ या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ त्याचा समांतर तपास सायबर क्राइम सेलकडून करण्यात आला़ संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले़ आरोपीने या महिलेला संपर्कासाठी वापरलेले मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊन पोलिसांनी त्याला पनवेल येथून ताब्यात घेतले़ तेव्हा त्याचे खरे नाव विशाल शर्मा असल्याचे उघड झाले़ त्याला अटक करुन त्यांच्याकडील वापरलेले ४ मोबाईल, एक बँकेचे डेबिट कार्ड हस्तगत करण्यात आले आहे़ 
या विशाल शर्मा याच्याविरुद्ध नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात २०१३ मध्ये अटक झाली होती़ तसेच नाशिक येथील भद्रकाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल असून त्यात तो फरार आहे़ 
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवते, पोलीस नाईक दीपक भोसले, किरण अब्दागिरे, नवनाथ जाधव, माने व शितल वानखेडे या पथकाने ही कामगिरी केली़ 
मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करुन शर्मा याने यापूर्वी अनेकांची फसवणूक केली असल्याचा पोलिसांना संशय आहे़ मोबाईल नंबर ८४३३८१८९३६ व ९८९०५९९२२७ या क्रमांकावरुन संपर्क करुन अशाप्रकारे फसवणूक करुन ऐवज अथवा मोबाईल चोरी झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाणे अथवा सायबर क्राईम सेलशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़ 


Web Title: Mobile stealer arrested from Panvel on advertising website
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.