मेट्रो मार्गातील अडथळे कायमच : रामवाडीचा मार्ग कल्याणीनगरमधूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 12:41 PM2019-06-01T12:41:47+5:302019-06-01T12:45:07+5:30

भुयारी मार्गाचे काम घेणाऱ्या कंपन्यांकडून सर्वेक्षण सुरू झालेले असतानाही अद्यपी फडके हौद चौकातील बाधित कुटुंबांचा प्रश्न सुटलेला नाही...

Metro road problems will always be : Ramwadi's route in only Kalyani Nagar | मेट्रो मार्गातील अडथळे कायमच : रामवाडीचा मार्ग कल्याणीनगरमधूनच

मेट्रो मार्गातील अडथळे कायमच : रामवाडीचा मार्ग कल्याणीनगरमधूनच

Next
ठळक मुद्देफडके हौदाचा निर्णय प्रलंबित मेट्रोचे किमान १०० कोटी रूपये जास्तीचे खर्च होणारकृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरूमेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे एकूण काम ३१ टक्के

पुणे: मेट्रोच्या मार्गातील अडथळे अजून कायमच आहेत. भुयारी मार्गाचे काम घेणाऱ्या कंपन्यांकडून सर्वेक्षण सुरू झालेले असतानाही अद्यपी फडके हौद चौकातील बाधित कुटुंबांचा प्रश्न सुटलेला नाही. रामवाडीकडे जाणारा मार्गही आगाखान पॅलेससमोरून जाण्याऐवजी कल्याणीनगरहून वळसा घेऊनच न्यावा लागणार आहे. दिल्लीतून हा प्रश्न सोडवू व वेळ पडल्यास भुयारी मार्ग करू, पण मार्ग आगाखान पॅलेससमोरूनच जाईल, असे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी ते पालकमंत्री असताना सांगितले होते. 
प्रत्यक्षात मात्र त्यासंदर्भात काहीच झालेले दिसत नाही. कारण हा मार्ग आगाखान पॅलेससमोरून वळवून कल्याणीनगरकडे व तिथून रामवाडीकडे नेण्याचा पर्याय वापरात आणण्यात आला आहे. कल्याणीनगरजवळ त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. महामेट्रो कंपनीच्या अभियंत्यांनीच याची माहिती दिली. त्यामुळे १ किलोमीटरला जास्तीचा वळसा पडून त्यावर मेट्रोचे किमान १०० कोटी रूपये जास्तीचे खर्च होणार आहेत. आगाखान पॅलेस राष्ट्रीय स्मारकांच्या यादीत आहे व त्यांनी हा मार्ग त्यांच्या संरक्षक भिंतीपासून १०० मीटरच्या आत येत असल्याची हरकत घेतली होती. त्याशिवाय कल्याणीनगर परिसरातील रहिवाशांनी तेथील पक्षी अभयारण्याचे कारण देत या मार्गाला विरोधही केला आहे.
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. स्वारगेटपासून व कृषी महाविद्यालयापासून अशा दोन्ही ठिकाणांहून हे काम सुरू होणार असून भूयार खोदणारी यंत्र फडके हौद चौकातून वर काढण्यात येणार आहेत. तिथे मेट्रोचे स्थानकही आहे. या कामात त्या भागातील सुमारे १०० कुटंबे बाधित होत आहेत. त्यांना महामेट्रो कंपनीने त्याच परिसरात नव्याने जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांना ते मान्य नाही. याही कामात बापट यांनी मला कसब्यातील सर्व अडचणी माहिती आहे व त्या बाधीत कुटुंबाला कुठेही जावे लागणार नाही याची काळजी घेऊ असे सांगितले आहे. त्यामुळेच की काय पण या कुटुंबांकडून कंपनीच्या वतीने होत असलेल्या सर्वेक्षणाला सहकार्य केले जात नाही.
कोणत्याही भुयारी मार्गाचे काम करायचे असेल तर त्याआधी त्या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ५० मीटर अंतरावरील सर्व इमारतींचे सर्वेक्षण केले जाते, त्याचा अभ्यास केला जातो. मार्गात खडक आहे की माती, खोदकाम केले तर कोणत्या इमारतींना धोका होऊ शकतो अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या अभ्यासात आहे. फडके हौद ते स्वारगेट या मार्गात १ हजार ४ इमारती आहेत, तर कृषी महाविद्यालय ते फडके हौद या मार्गात ५५६ इमारती आहेत. त्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र फडके हौद चौकातील इमारत मालकांनी असे सर्वेक्षण करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे तिथे काहीही काम झालेले नाही, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
दरम्यान, मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे एकूण काम ३१ टक्के झाले आहे. पिंपरी-चिंचवड ते दापोडी व वनाज ते गरवारे महाविद्यालय हे दोन्ही मार्ग डिसेंबर २०१९ अखेर सुरू करण्याचे उद्दीष्ट महामेट्रो ने ठेवले असून त्यादृष्टिने कामाला गती देण्याबाबत ठेकेदार कंपनीला सुचना केल्या आहेत. बांधकाम पुर्ण झाल्यानंतर लगेचच विद्यूत व्यवस्थेचे कामही सुरू करण्यात येणार असून त्याची निविदा वगैरे सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. मेट्रोची बोगी वेळ पडल्यास नागपूरहून मागवण्यात येणार असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले. 

Web Title: Metro road problems will always be : Ramwadi's route in only Kalyani Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.