काश्मिरी गळ्यातून उतरले ज्ञानदेवांचे पसायदान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 07:00 AM2019-06-30T07:00:00+5:302019-06-30T09:42:13+5:30

बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकत मोठी झालेली '' ति '' शांततेसाठी भाषांची सरहद ओलांडून माय मराठीच्या अंगणात रमू लागली आहे.

Message of peace to the world by Kashmiri sound | काश्मिरी गळ्यातून उतरले ज्ञानदेवांचे पसायदान

काश्मिरी गळ्यातून उतरले ज्ञानदेवांचे पसायदान

Next
ठळक मुद्देधर्मापलिकडील बांधिलकी : भाषिक मर्यादा ओलांडत काश्मिरी मुस्लिम तरुणीने गायले पसायदान 

पुणे : तिच्या घरावर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ती अवघ्या सहा महिन्यांची होती. या हल्ल्यात तिची आत्या मारली गेली. आईने तिला वाचविण्यासाठी बसखाली फेकले. बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकत मोठी झालेली '' ति '' शांततेसाठी भाषांची सरहद ओलांडून माय मराठीच्या अंगणात रमू लागली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले पसायदान आपल्या अस्सल काश्मिरी आवाजात सादर करत अल्लाहकडे अमन मागते आहे. 

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. अवघा महाराष्ट्र वारीमय झाला आहे. त्यातच एका आवाजाने सर्वांना भूरळ घालायला सुरुवात केली आहे.

काश्मिरमधील बांदीपूरा जिल्ह्यामधील आरागाम येथील शमिमा अख्तर हिच्या वडीलांचे छोटे दुकान आहे. भावंडांसह हे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. पुण्यातील सरहद संस्थेसोबत मागील आठ महिन्यांपासून काम करते आहे. लहानपणापासून असलेली संगिताची आवड पाहून सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी तिला काश्मिरी तरुणांच्या 'गाश बँड' मध्ये सहभागी करुन घेतले. सर्वप्रथम तिला २०१६ साली पुण्यामध्ये गाण्यासाठी बोलावण्यात आले होते. तिने आतापर्यंत पुण्यात पाच-सहा कार्यक्रम केले आहेत. 



संगीताच्या माध्यमातून विविध प्रदेशांना जोडण्याचा प्रयोग सरहदच्यावतीने सुरु करण्यात आला आहे. यासोबतच सर्वांना शांततेचा संदेश देण्यासाठी पसायदानाएवढे प्रभावी माध्यम असू शकत नाही असा विचार करुन शमिमा हिला पसायदानासंदर्भात विचारणा करण्यात आली. पसायदानाचा अर्थ नीट समजून घेतल्यावर ती पटकन तयार झाली. जगाच्या सुखासाठी, शांततेसाठी विश्वात्मकाकडे केलेली मागणी तिला भावली. सुरुवातीला पसायदानातील मराठी उच्चार अवघड जात होते, परंतू सरावानुसार उच्चार स्पष्ट होत गेले. 
शमिमाने लहानपणापासूनच हिंसाचार आणि रक्तपात पाहिला आहे. त्यामुळे तिला शांततेचे महत्व अधिक समजू शकते आणि ती इतरांनाही पटवून देऊ शकते. देश-धर्म-पंथाच्या पलिकडे जाऊन माणसाला माणसाशी जोडणारे पसायदान गायला शमिमाने सुरुवात केली. मुळचा काश्मिरी असलेला मजहर सिद्दीकी याने तिच्याकडून तयारी करुन घेतली. मजहर सध्या सरहदच्या संगित विभागाचा प्रमुख आहे. काश्मिरी सुरावटीमध्ये पसायदान गाताना ती तल्लीन होऊन जाते. काश्मिरी मुस्लिम तरुणी पसायदान गाते याचे अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी तिचे सोशल मीडियावरील व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिले आहेत. 
====
पसायदानाच्या माध्यमातून एका पिढीची वेदना व्यक्त होत आहे. पसायदान ही वैश्विक प्रार्थना आहे. सध्या धर्म-जाती आणि माणसांमध्ये भेदाभेद वाढत चालले आहेत. महाराष्ट्र आणि काश्मिरचे ऐतिहासिक नाते आहे. संत ज्ञानेश्वरांनी वाईट प्रवृत्ती बदलून सर्वांचे मंगल व्हावे असा वैश्विक विचार मांडला. शमिमाने तेथील हिंसाचार पाहिला आहे. आम्ही संगितात वेगळे प्रयोग करीत आहोत. काश्मिरी मुस्लिम तरुणीच्या पसायदानामधून एक साकारात्मक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- संजय नहार, संस्थापक, सरहद 
====
पुण्यात आल्यावर पसायदान ऐकले. सुषमा नहार यांनी त्याचा अर्थ समजावून सांगितले. प्रार्थना करीत अल्लाहकडे मी जी दुवा मागते त्यामध्ये आणि पसायदानामध्ये कोणताही फरक नाही हे लक्षात आले. पसायदान फक्त हिंदूंसाठीच आहे असे कुठेही वाटले नाही. त्यामध्ये एक वैश्विक आषय आहे. भाषा मराठी असली तरी मी  अल्लाहची प्रार्थना करते अगदी त्याच भावनेने गायला सुरुवात केली. सर्व मानवजातीच्या शांतता आणि खुशहालीसाठी पसायदानाच्या माध्यमातून दान मागताना मला खूप आनंद होतो आहे. 
  .

Web Title: Message of peace to the world by Kashmiri sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.