पुणे : भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमडीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
प्रियंका देविदास भालेराव (वय २६, सध्या रा. पीजी गर्ल्स हॉस्टेल, भारती विद्यापीठ, मूळ रा. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करीत होती. संस्थेच्या पीजी गर्ल्स हॉस्टेलमधील ४०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये ती मैत्रीणीसह राहात होती. रविवारी तिच्या मैत्रीणीची रात्रपाळी असल्याने ती ड्युटीवर गेली होती. खोलीमध्ये एकट्या असलेल्या प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिची मैत्रीण सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास खोलीवर आली. तिने बराच वेळ दार वाजवले परंतु आतून कोणीही दार उघडत नव्हते.
त्यामुळे तिने तेथील स्लायडिंगच्या खिडकीची काच सरकवून खोलीमध्ये डोकावून पाहिले असता, प्रियंकाने गळफास घेतल्याचे दिसले. तिने सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी खोलीचे दार उघडून आतमध्ये प्रवेश केला. तिच्याजवळ कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.