साहित्य वारसा होणार जतन; ‘मसाप’तील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:37 AM2018-01-18T11:37:17+5:302018-01-18T11:49:45+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळग्रंथांचा त्यात समावेश आहे.

Material will be saved; rare book Digitization of Maharashtra Sahitya Parishad | साहित्य वारसा होणार जतन; ‘मसाप’तील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनला अखेर मुहूर्त

साहित्य वारसा होणार जतन; ‘मसाप’तील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनला अखेर मुहूर्त

Next
ठळक मुद्दे मसाप संकेतस्थळावरील ई-ग्रंथालयात हा अनमोल ठेवा वाचकांसाठी होणार उपलब्ध या दुर्मीळ ग्रंथाचे डिजिटायजेशन लोकसहभागातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : शतकोत्तर दशकपूर्तीचा टप्पा पार केलेल्या आणि महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळग्रंथांचा त्यात समावेश आहे. या कामासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे सहकार्य साहित्य परिषदेला लाभले आहे. या ग्रंथांचे डिजिटायजेशन पूर्ण झाल्यानंतर मसाप संकेतस्थळावरील ई-ग्रंथालयात हा अनमोल ठेवा वाचकांसाठी, संशोधकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहे.
परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वैभव असलेले (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय नेहमीच संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहे. ५०,०००हून अधिक मौलिक संदर्भग्रंथांनी समृद्ध असलेल्या या ग्रंथालयात साहित्यप्रेमी वाचकांबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नेहमीच राबता असतो. दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वीचे दुर्मीळ ग्रंथ हाताळणे जिकीरीचे झाले होते. हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी परिषदेच्या कार्यकारी मंडळाने या दुर्मीळ ग्रंथाचे डिजिटायजेशन लोकसहभागातून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यासाठी ग्रंथ दत्तक घेण्याचे आवाहनही साहित्यप्रेमींना केले. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. निधी अभावी काम अडू नये यासाठी कार्यकारी मंडळानेच पुढाकार घेतला. कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांनी प्रत्येकी ११ ग्रंथ दत्तक घेण्याचा तर कार्यकारी मंडळातील इतर सदस्यांनी प्रत्येकी एक ग्रंथ दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यातून या प्रकल्पाला गती मिळाली. 
ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे म्हणाले, की परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि निखिलेश कुलकर्णी यांच्या बरोबरच्या बैठकीत डिजिटायजेशनसाठी सहकार्याचा भांडारकर संशोधन मंदिराने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अत्याधुनिक स्कॅनिंग मशीनच्या साह्याने हे डिजिटायजेशनचे काम पूर्ण होणार आहे. या सहकार्याबद्दल परिषद भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या कायम ऋणात राहील.

कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचा इतिहास 
परिषदेचे संस्थापक चिटणीस कै. वा. गो. आपटे यांच्या नावाचा 'वा. गो. आपटे इस्टेट ट्रस्ट' सदाशिव पेठेत होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष श्री. म. माटे यांनी त्या ट्रस्टच्या विश्व्स्तांशी संपर्क साधून १९४९ साली १०,००० रुपयाची देणगी मिळवली, ट्रस्टच्या अटीनुसार आपटे यांच्या स्मरणार्थ संदर्भ ग्रंथालय उभारण्यात आले. १९५१च्या मे महिन्यात वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाची प्रतिष्ठापना झाली. या ग्रंथालयातून दुर्मीळ आणि संदर्भात्मक ग्रंथ सोडून कोणतेही पुस्तक सभासदांना घरी वाचण्यासाठी दिले जाते. दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायजेशन करण्यासाठी परिषदेने सुरु केलेल्या 'ग्रंथ दत्तक योजनेला' साहित्यप्रेमींनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.

Web Title: Material will be saved; rare book Digitization of Maharashtra Sahitya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.