Maruti Chitampalli elected president of the paryavaransnehi sahitya samelan | पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारूती चितमपल्ली यांची निवड

ठळक मुद्देमांडणार विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे विविध ठराव लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन

पुणे : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ६ जानेवारी रोजी सातव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांची निवड करण्यात आली आहे. ‘हे संंमेलन विविध कार्यक्रमांनी रंगणार असून, विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे विविध ठराव मांडणार आहेत. 
संमेलनाचे उद्घाटन लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे.  उद्घाटन सत्रानंतर 'चंगळवादी वृत्ती आणि पर्यावरण' या विषयावर त्यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर 'प्रदुषित नद्या आणि आपण' या विषयावर परिणिता दांडेकर बोलणार आहेत. पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण  होणार असून,  उत्तरार्धात अंकुश आरेकर व लता ऐवळे हे 'रानातल्या कविता' सादर करणार आहेत. डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रिया चित्राव यांचा 'हिरवाई' हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण होणार असून,  संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होणार आहे. जयंत कर्णिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी १० ते ५ या वेळेत संमेलन होणार आहे. महाविद्यालयीन युवकांचा सहभाग हे संमेलनाचे वैशिष्ट्य असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.
ठरावांची अमंलबजावणी होणार
साहित्य संमेलनाप्रमाणे या संमेलनात विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे ठराव मांडणार आहेत. स्वत: च्या जीवन शैलीपासून ते महाविद्यालयाच्या परिसरातील पर्यावरणाबरोबरच भोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाविषयीचे हे ठराव सूचक-अनुमोदकासह मंजूर करण्यात येणार आहेत. या ठरावांची अमंलबजावणी होईल, असे मिलिंद जोशी यांनी सांगितले.