मर्ढेकर, तांबे यांच्यापलीकडे समीक्षाच जात नाही, शरद पवार यांचा समीक्षकांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:13 AM2018-01-28T03:13:12+5:302018-01-28T03:13:29+5:30

बा. सी. मर्ढेकर आणि भा. रा. तांबे हे मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी आहेत. त्यांची कोणत्याच कवींशी तुलना होऊ शकत नाही. हे मान्य असले तरी मर्ढेकर आणि तांबे यांच्यापलीकडे समीक्षा जात नाही, अशा शब्दातं माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी समीक्षकांना टोला लगावला. ‘मी नव्या पिढीची कविता शोधतोय.

 Mardhekar, does not go beyond the copper, criticizes the critics of Sharad Pawar | मर्ढेकर, तांबे यांच्यापलीकडे समीक्षाच जात नाही, शरद पवार यांचा समीक्षकांना टोला

मर्ढेकर, तांबे यांच्यापलीकडे समीक्षाच जात नाही, शरद पवार यांचा समीक्षकांना टोला

Next

पुणे : बा. सी. मर्ढेकर आणि भा. रा. तांबे हे मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी आहेत. त्यांची कोणत्याच कवींशी तुलना होऊ शकत नाही. हे मान्य असले तरी मर्ढेकर आणि तांबे यांच्यापलीकडे समीक्षा जात नाही, अशा शब्दातं माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी समीक्षकांना टोला लगावला. ‘मी नव्या पिढीची कविता शोधतोय. सामान्य कुटुंबातील, उपेक्षित घटकातील तरुणांची मनातील खदखद कवितेतून बाहेर पडत आहे. कुणीतरी कवितेतून कुणाचा तरी बाप काढतो... अशा समाजातील धगधगत्या नवोदित बंडखोर कवींची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा आणि बुकगंगा पब्लिकेशनच्या वतीने सतीश ज्ञानदेव राऊत लिखित ‘पाझर हृदयाचा’ या काव्यसंग्रहाच्या प्रिंट, इ-बुक आणि आॅडिओ बुकचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, कवी अरुण शेवते, महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, बुकगंगाचे मंदार जोगळेकर आणि सभेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘एकदा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमवेत गाडीमधून जात असताना एका वृद्ध महिलेने हात केला. गाडीत चव्हाण बसला आहे का? असे विचारले आणि मी हो हे चव्हाण आहेत असे हात करून तिला सांगितले. त्यांना पाहून तिने आपल्या बटव्यातून काढलेला चांदीचा रुपया चव्हाण यांच्या हातात ठेवला आणि तू समाजहिताची कामे करतोस, म्हणून हे तुला खाऊला पैसे घे... असे त्या महिलेने सांगताच चव्हाण यांच्या डोळ्यात पाणी आले. काही अनुभव लिखित स्वरूपाचे नसले तरी ते एक ‘काव्य’ आहे. जे वेगळ्या अर्थाने आपल्या जगण्याला दिशा देतात.
मर्ढेकर आणि तांबे हे श्रेष्ठच आहेत. पण मी नव्या पिढीच्या कविता शोधतो आहे. अनेक तरुणांच्या कविता मी ऐकतो, त्यातील बरेच कवी हे उपेक्षित घटकातील आहेत. आपल्या मनातील खदखद ते कवितेतून बाहेर काढतात तेव्हा आपल्याला अस्वस्थ व्हायला होते. औरंगाबाद, बीड, पुणेसारख्या भागातून युवा कवींचा वर्ग तयार होतो आहे, त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सतीश राऊत यांच्या कवितांवरही पवार यांनी मिश्किल भाष्य केले. हा कवी दिल्लीत शासकीय अधिकारी म्हणून का रमला नाही, हे सांगताना त्यांनी चक्क राऊत यांची कविताच उपस्थितांसमोर सादर केली. ‘किती दिवस नाही बोललो तुझ्याशी, लेखणी बंद आहे उशाशी,’ म्हणूनच हे रमले नाहीत, अशी टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला. राऊत यांनी राजकीय विषयांवर कवितांमधून भाष्य केले नाही, मात्र ‘निवडणुका’ ही एक कविता गवसली. चौदा निवडणुका लढविल्या पण ही कविता वाचताना बºयाच गोष्टी राहून गेल्या असे वाटते. आता त्याची पुन्हा पूर्तता होणे नाही, असे सांगून त्यांनी कवितेचे सादरीकरण केले. निवडणूक जिंकण्याचा असाही मार्ग असतो हे कधी कळलेच नाही. अशी परिस्थिती कधी आली नाही आणि कधी असे करावेही लागले नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
सतीश राऊत यांनी कवीची भूमिका विशद करताना इयत्ता नववीमधील शिक्षकांनी निबंधाला दिलेली चांगल्या लेखनाची पावती आणि तिथूनच लेखनाला मिळालेली चालना असे सांगून लेखनाचे टप्पे उलगडले.
मंदार जोगळेकर, अरुण शेवते, उद्धव कानडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. वसुंधरा काशीकर-भागवत यांनी सूत्रसंचालन केले.

सुशीलकुमारांची फिरकी घेतल्याचा किस्सा रंगला

रामदास फुटाणे यांनी एका गीतकाराच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी घडलेला किस्सा सांगितला. सोलापूरमध्ये साहित्य महामंडळातर्फे ‘भाऊबीज’ चित्रपटाची गाणी लिहिणाºया कवीचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सुशीलकुमार शिंदे यांनी भाषणात त्या कवीची गंभीर कविता सादर केली. जेव्हा शरद पवार भाषणाला उठले तेव्हा त्यांनी सुशीलकुमारांनी ‘पडला पदर खांदा तुझा दिसतो गं’ अशी कविता सादर करायची... राजकारण्याला गंभीर कविता शोभत नाहीत, अशी सुशीलकुमारांची फिरकी घेतल्याची आठवण सांगताच सभागृह पोट धरून हसायला लागले.

जेव्हा साहेबांचेच प्रेमपत्र पकडले जाते....

मला नेहमी विचारले जाते, तुम्ही कधी कविता केली आहे का? एकदाच करून बसलो आणि कसा फसलो याची आठवण साहेबांनी सांगितली. ‘मी कधीही कविता करायच्या भानगडीत पडलो नाही, मात्र महाविद्यालयीन काळात मित्रांसोबत गप्पा मारताना सहज दोन ओळी एका कागदावर खरडल्या होत्या.’ ‘का वाटे रोहिणीस चंद्रासवे राहावे, हे आपुले स्वप्न तू... पुरे करावे’ अशा या दोन ओळी होत्या. पण हा कागद माझ्या आईच्या हाती गेला. त्या ओळी वाचून माझे बंधू आईला म्हणाले, ‘आता शरदसाठी मुलगी पाहा.. कारण त्याचे अपूर्ण स्वप्न कुठे जाईल, याचा काही भरवसा नाही. तेवढा संबंध सोडला तर माझा कवितेशी कधी संबंध आला नाही,’ अशी आठवण शरद पवारांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

ना. धों. नव्हे धो धो महानोर

माझे अनेक कवी मित्र आहेत, त्यातलेच एक ना. धों. महानोर. ते एकदा बोलायला लागले की थांबतच नाहीत. एका कार्यक्रमाला मी, ना. धों. महानोर आणि पु. ल. देशपांडे होतो. महानोर बोलायचे थांबतच नव्हते. त्यांच्यानंतर पु. ल. यांनी मग बॅटिंगच सुरू केली. आपले पूज्य कवी ना. धों नव्हे धो. धो. महानोर. ज्यांचे धोधो सुरू झाले आहे... अशा शब्दांत पु. ल. यांनी मिश्किल कोटी केली असल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

Web Title:  Mardhekar, does not go beyond the copper, criticizes the critics of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.