मराठी भाषा संत परंपरेमुळे समृध्द झाली - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 04:48 PM2018-07-08T16:48:30+5:302018-07-08T16:48:43+5:30

हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला देता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली.

Marathi language was rich in saint tradition - Chief Minister | मराठी भाषा संत परंपरेमुळे समृध्द झाली - मुख्यमंत्री

मराठी भाषा संत परंपरेमुळे समृध्द झाली - मुख्यमंत्री

Next

पुणे : संतांचे विचार कालसापेक्ष आहेत, काळाच्या कसोटीवर ते विचार योग्य ठरतात असे केवळ म्हणून चालणार नाही. त्या त्या काळाचा अनुभव, सत्य, विचार, वास्तविकता याच्या आधारावर संत साहित्याचे पुन्हा पुन्हा लिखाण होणे आवश्यक आहे. त्याव्दारे हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला देता येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली.

श्री गंधर्व वेद प्रकाशनतर्फे संत निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायपर्यंतच्या संत परंपरेची ओळख करून देणा-या १३ चरित्र ग्रंथांचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कीर्तन-प्रवचनकार चैतन्यमहाराज देगलूरकर, पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ग्रंथाचे संपादक डॉ सदानंद मोरे आणि अभय टिळक, प्रकाश खाडिलकर, दीपक खाडिलकर आदी उपस्थित होते. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या विचारांवर संत साहित्याचा पगडा आहे. मराठी भाषा समृध्द झाली ती संत परंपरेमुळे. ज्ञानोबारायांनी त्याची सुरूवात केली. बदललेल्या काळातही संत साहित्याचा विचार महत्त्वाचा आहे. नव्या पिढीवर या साहित्याचा प्रभाव पडावा यासाठी त्या पिढीला विचार कळेल अशा भाषेत ते साहित्य लिहले गेले पाहिजे. संतांनी अध्यात्म आणि भौतिक जीवन यांचे सांगड घातली. संत साहित्यामुळे आमचा विचार, संस्कृती, भाषा अनेक आक्रमणांनंतरही जिवंत राहिली.’’

 चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे.  तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

औसेकर महाराज म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. 
सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला पाचशे वर्षांची संत परंपरा आहे, त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती टिकविण्याचे काम केले. या संतांची चरित्रे आजच्या नव्या दृष्टिकोनातून लिहिण्याची गरज होती. अनेक नवे जुने प्रख्यात लेखकांचा यामध्ये समावेश आहे. राज्याचा सामाजिक पोत घडविण्यात संतांचे फार मोठे योगदान आहे.’’
अभय टिळक यांनी सुत्रसंचालन केले.

Web Title: Marathi language was rich in saint tradition - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.