बँकांच्या एटीएम मशिनमधून मराठी हद्दपार : त्रिभाषा सूत्र कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 07:00 AM2019-07-12T07:00:00+5:302019-07-12T07:00:04+5:30

अनेक बँकांच्या एटीएम मशीनमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने ' लोकमत'  पाहणीतून समोर आले आहे

Marathi Exit From Bank ATM Machins | बँकांच्या एटीएम मशिनमधून मराठी हद्दपार : त्रिभाषा सूत्र कागदावरच

बँकांच्या एटीएम मशिनमधून मराठी हद्दपार : त्रिभाषा सूत्र कागदावरच

Next
ठळक मुद्देभाषिक अस्मिता कशी जपली जाणार?शहरातील अनेक एटीएम मशीनमध्ये पूर्वी आर्थिक व्यवहार करताना मराठी भाषेचा पर्याय होता उपलब्ध बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा मोजक्यास बँकांमध्ये मराठी भाषेची सुविधा

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे दररोजच्या आर्थिक व्यवहारातून मात्र मराठी लुप्त होताना दिसत आहे. शहरातील अनेक एटीएम मशीनमध्ये पूर्वी आर्थिक व्यवहार करताना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होता. आता अनेक बँकांच्याएटीएम मशीनमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने ' लोकमत'  पाहणीतून समोर आले आहे. नळ स्टॉप, प्रभात रस्ता, आनंदनगर, वारजे माळवाडी, कोथरुड अशा विविध भागांतील बँक ऑफ  इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ  इंडिया, सेंट्रल बँक आदी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्यवहार करता येणे शक्य होत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी, आयसीआयसीआय अशा मोजक्यास बँकांमध्ये मराठी भाषेची सुविधा उपलब्ध आहे.
पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकांच्या रांगेत थांबून वाट पहावी लागत असे. एटीएम मशीनची यंत्रणा आल्यानंतर पैसे काढणे सामान्य माणसाला सहजशक्य झाले. सर्व स्तरांतील लोकांना एटीएमचा वापर करता यावा, यासाठी बहुतांश वेळा मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय उपलब्ध करुन दिलेले असतात. नोटाबंदीनंतर शंभर, दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. त्याप्रमाणे एटीएम मशीनमध्येही बदल करण्यात आले. मात्र, आता मशीनमधून मराठी भाषाच हद्दपार झाली आहे. 
    २६ जानेवारी १९६५ पासून राजभाषा म्हणून मराठी भाषेचा अंगिकार करण्यात आला. शासन व्यवहारात मराठीचा वापर व्हावा, यासंदर्भात राज्य शासनाकडून ७ मे २०१८ रोजी अध्यादेश काढण्यात आला. दुसरीकडे, नवीन पिढीचा इंग्रजीकडे ओढा वाढलेला असताना सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत मराठी शिकवणे सक्तीचे केले जावे, यासाठी प्रयत्न सुरु आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतही आशादायी चित्र निर्माण झाले आहे. असे असताना सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग असलेल्या आर्थिक व्यवहारांमधून मात्र मराठी लुप्त होत आहे.
    बँक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएम मशीनसाठी संबंधित उत्पादक कंपन्यांकडून खचार्चे अंदाजपत्रक मागवले जाते. त्यापैकी रास्त दर असणा-या कंपनीकडून मशीन खरेदी केली जातात. सध्या मशीनमध्ये वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. काही मशीनमध्ये ब्रेल लिपी उपलब्ध असते, तर काहींमध्ये ती नसते. त्याचप्रमाणे भाषेच्या बाबतही फरक पडतो. नोटाबंदीनंतर नवीन नोटा आल्यानंतर अनेक बँकांनी मशीन बदलली आहेत. त्यामुळे मशीनच्या प्रकारानुसार भाषेमध्येही फरक पडतो. मात्र, भाषेबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
--------------
बँकांच्या एटीएममध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नसेल, ही बाब अन्यायकारक आहे. आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून, केंद्रीय आस्थापनांमध्ये हिंदी आणि इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषा वापरली पाहिजे, असे निर्देश आहेत. त्याचे पालन सर्वच बँकांनी करायला हवे. पालन होत नसल्याच ते चुकीचे आणि भाषिक अस्मितेला ठेच पोहोचवणारे आहे. यासाठीच मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी आमची मागणी आहे. नियमांची अंमलबजावणी आणि मराठीचा वापर होत नसेल तर प्राधिकरण हस्तक्षेप करु शकते. 
- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष
--------------
पब्लिक सेक्टर बँकांमध्ये ए आणि बी अशा दोन प्रकारांची वर्गवारी असते. ए क्लासमध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक आदींचा समावेश होतो. या बँका अखिल भारतीय स्तरावरील असतात. त्यांच्या देशभरात हजारो शाखा असतात. त्यामुळे बहुतेक वेळा हिंदी अािण इंग्रजी या सर्वसमावेशक भाषांचा पर्याय उपलब्ध करुन दिलेला असतो. बी वर्गामध्ये सिंडिकेट बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, कॉपोर्रेशन बँक आदींचा समावेश असतो. या बँकांच्या ७०-७५ टक्के शाखा संबंधित राज्यांमध्ये असतात. त्यामुळे प्रादेशिक भाषेची सुविधा उपलब्ध करुन दिलेली असते. अखिल भारतीय स्तरावरील बँकांना सॉफ्टवेअरमध्ये बदल करायचा झाल्यास सर्व ठिकाणी एकाच वेळी अंमलबजावणी करणे अवघड असते. कोणी मागणी केल्यास अथवा प्रश्न उपस्थित केल्यास असे बदल करता येणे शक्य आहे. बँकांच्या व्यवहारामध्ये मराठीचा वापर अनिवार्य असावा असे केंद्र सरकारचे धोरण आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.
- अजेंद्र जोशी, विभागीय सचिव, नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्स

एटीएम मशीनमध्ये वापरले जाणारे मराठी शब्द

एंटर युअर पिन नंबर - कृपया आपला पिन प्रविष्ट करा
कंटिन्यू - सुरु ठेवा
कॅश विड्रॉअल - रक्कम काढणे
बॅलन्स एन्क्वायरी - शिल्लक रकमेची माहिती
पिन चेंज - पिन बदल
मिनी स्टेटमेंट - लघु विवरण
न्यू अकाऊंट - नवीन खाते उघडणे
करंट अकाऊंट - चालू खाते
सेव्हिंग अकाऊंट - बचत खाते 
रिसिट - पावती
 

Web Title: Marathi Exit From Bank ATM Machins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.